'आप'कडून जाहिरातीसाठी करदात्यांच्या पैशाचा गैरवापर : भाजप

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

दिल्ली सरकारने सरकारच्या अखत्यारित नसलेल्या दिल्लीबाहेरील परिसरात केलेल्या जाहिरातींसाठी 28 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याची माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. या जाहिरातींमध्ये आपचे नाव आणि बोधचिन्ह वापरल्याने जाहिरातींमध्ये "राजकीयदृष्ट्या तटस्थतता असावी' या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा भंग आपने केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : जाहिरातींवर खर्चाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षावर अलिकडेच टीका केली होती. त्यानंतर आता भाजपने याच मुद्यावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. 'आप'कडून स्वयंप्रचाराच्या जाहिरातींसाठी करदात्यांच्या पैशाचा गैरवार केला जात असल्याची टीका भाजपने केली आहे.

शुक्रवारी महालेखापरीक्षकांनी (कॅग) दिल्ली विधानसभेत 2015-16 मधील आर्थिक तरतुदींसंदर्भातील एक अहवाल सादर केला. दिल्ली सरकारने सरकारच्या अखत्यारित नसलेल्या दिल्लीबाहेरील परिसरात केलेल्या जाहिरातींसाठी 28 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याची माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. या जाहिरातींमध्ये आपचे नाव आणि बोधचिन्ह वापरल्याने जाहिरातींमध्ये "राजकीयदृष्ट्या तटस्थतता असावी' या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा भंग आपने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जाहिरातींमध्ये दिल्ली सरकारला "केजरीवाल सरकार' किंवा "झाडू सरकार' असे संबोधण्यात आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेते आर. पी. सिंह यांनी केजरीवाल सरकारकडे जाहिरातींसंदर्भातील योग्य त्या कागदपत्रांचा अभाव असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यावरून केजरीवाल सरकार "आप'च्या प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे, असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, "आपकडून केवळ जाहिरातींमधून त्यांच्या विचारांचा प्रचार करण्यात येतो. ज्या शहरांचा जाहिरातींमधील कार्यक्रमांशी काहीही संबंध नाही अशा मुंबई, रांची, चेन्नई आणि पंजाबमध्ये येथेही जाहिरात करण्यात आलेली आहे. यावरून हेच सिद्ध होते की भरीव योजना आणण्यापेक्षा दिल्ली सरकार केवळ प्रचाराच्या जाहिराती देण्यात व्यग्र आहे.'

Web Title: AAP misusing taxpayers money for advertisement : BJP