पराभवाची जबाबदारी स्वीकारत आमदार अलका लांबा यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्ली विधानसभेतील आमदार अलका लांबा यांनी आमदार पदासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्ली विधानसभेतील आमदार अलका लांबा यांनी आमदार पदासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

दिल्लीतील तीनही महानगरपालिकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (बुधवार) सुरू झाली. त्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भारतीय जनता पक्षाने आघाडी मिळविली आहे. आप आणि काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर लांबा यांनी ट्‌विटरद्वारे राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, "सर्व तीन वॉर्डांमध्ये झालेल्या पराभवाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून मी आमदारपदासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला आणि अरविंद केजरीवाल यांना मी "आप'द्वारे तोपर्यंत बळ देत राहील जोपर्यंत हे आंदोलन अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही. आपल्या साऱ्यांना माहिती आहे की आजच्या काळात भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई सोपी नाही. तरीही हा लढा बदलाकडे जाण्यासाठी असाच पुढे सुरु राहील.'

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. "पराभवाची जबाबदारी स्वीकारून मी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीमाना देत आहे. एक वर्ष मी पक्षात कोणतेही पद स्वीकारणार नसून केवळ एक पक्ष कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे', असे त्यांनी जाहीर केले आहे.

Web Title: AAP's Alka Lamba offers resignation post MCD polls defeat