आरुषी-हेमराज हत्याप्रकरणी तलवार दाम्पत्याची मुक्तता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

तलवार यांच्या नोएडातील घरी 15 मे, 2008 च्या रात्री आरुषीचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमत: हेमराज हा या खुनामधील मुख्य संशयित मानण्यात येत होता. मात्र दोनच दिवसांनंतर हेमराज याचाही मृतदेह तलवार राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आढळून आला

नवी दिल्ली - देशभर गाजलेल्या आरुषी तलवार हत्या प्रकरणासंदर्भातील खटल्याची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राजेश व नुपूर तलवार या आरुषीच्या पालकांची निर्दोष मुक्तता केली. आरुषी व तलवार कुटूंबामधील नोकर असलेल्या हेमराजच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने 2013 मध्ये तलवार दांपत्य दोषी असल्याचा निकाल दिला होता. मात्र उच्च न्यायालयाने आज हा निकाल फिरवित तलवार दाम्पत्यास संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले.

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे सुनावणी करताना सीबीआय न्यायालयाने दोषी करार दिलेले तलवार दाम्पत्य सध्या गाझियाबाद येथील दसना तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. न्यायालयाच्या या शिक्षेस तलवार यांनी जानेवारी 2014 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाचा हा निकाल आला आहे.

तलवार यांच्या नोएडातील घरी 15 मे, 2008 च्या रात्री आरुषीचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमत: हेमराज हा या खुनामधील मुख्य संशयित मानण्यात येत होता. मात्र दोनच दिवसांनंतर हेमराज याचाही मृतदेह तलवार राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आढळून आला. या प्रकरणासंदर्भात करण्यात येत असलेल्या तपासावर झालेल्या प्रचंड टीकेच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी 1 जून 2008 रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची घोषणा केली होती.

मात्र सीबीआयकडून या प्रकरणी करण्यात आलेला तपासही वादग्रस्त ठरला. सीबीआयच्या दोन वेगवेगळ्या पथकांकडून या प्रकरणी वेगवेगळा निष्कर्ष काढण्यात आल्याने या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली होती. दुसऱ्या पथकाने केलेल्या तपासाच्या पार्श्‍वभूमीवर तलवार यांना सीबीआय न्यायालयाकडून शिक्षा सुनाविण्यात आली होती.

Web Title: Aarushi-Hemraj murder case: Allahabad HC acquits Nupur, Rajesh Talwar