आरुषी तलवार खटला पुन्हा एकदा चालणार

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

 आरुषी आणि हेमराज हत्याकांडप्रकरणी तलवार दांपत्यास गेल्यावर्षी 12 ऑक्‍टोबरला दोषमुक्त करण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हेमराजच्या पत्नीने गेल्यावर्षी 7 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. तलवार दांपत्यास जामीन मंजूर करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे

नवी दिल्ली - बहुचर्चित आरुषी- हेमराज हत्या प्रकरणी राजेश आणि नूपुर तलवार यांना दोषमुक्त करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हेमराजच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. खुमकला बन्जाडे असे हेमराजच्या पत्नीचे नाव आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतल्याने आता हा खटला पुन्हा चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 आरुषी आणि हेमराज हत्याकांडप्रकरणी तलवार दांपत्यास गेल्यावर्षी 12 ऑक्‍टोबरला दोषमुक्त करण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हेमराजच्या पत्नीने गेल्यावर्षी 7 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. तलवार दांपत्यास जामीन मंजूर करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने या प्रकरणाला हत्या म्हटले आहे; मात्र कोणालाच दोषी ठरवलेले नाही, असे याचिकेत म्हटले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरुषी- हेमराज यांच्या हत्येप्रकरणी 26 नोव्हेंबर 2013 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, या निकालाविरोधात तलवार कुटुंबाने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सीबीआयच्या युक्तिवादाने समाधानी नसल्याचे सांगत तलवार दांपत्यास दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यानंतर राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना न्यायालयाने ऑक्‍टोबर 2017 मध्ये दोषमुक्त केले. आरुषी आणि हेमराजची हत्या 15 मे 2008 रोजी नोईडाच्या सेक्‍टर 25 मध्ये जलवायू विहार येथील घरी झाली होती. 16 मे रोजी सकाळी आरुषीचा मृतदेह तिच्या खोलीत सापडला. तलवार दांपत्यांने ही हत्या नोकर हेमराजने केल्याचा आरोप केला. मात्र हेमराजचा मृतदेह देखील तलवार दांपत्यांच्या फ्लॅटच्या गच्चीवर सापडल्याने या प्रकरणाला वळण मिळाले.                  

Web Title: Aarushi murder case: SC agrees to hear Hemraj’s wife’s plea