रेल्वेतल्या फिरत्या विक्रेत्याने कसा केला हजारो कोटींचा गैरव्यवहार?

गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

रेल्वेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयाचा मुलगा असलेल्या अब्दुल करीम तेलगीच्या गैरव्यवहाराने अवघा देश हादरला होता. मुंबई पोलिसांनी 1991 मध्ये सर्वप्रथम त्याला फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक केली होती. मुंबईतच ट्रॅव्हल एजंट म्हणून तेलगी काही काळ काम करत होता. मुंबईत त्याने अंडरवर्ल्डशी सुत जुळवले आणि हळू हळू आपल्या गुन्हेगारीचे जाळे विस्तारले. 

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगी म्हणजे भारतीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आरोपी होता. बंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये आज तेलगी मरण पावला. ग्रामिण भागापासून ते महानगरांपर्यंत सर्वत्र सातत्याने भासणाऱया 'स्टँप' किंवा मुद्रांक तुटवड्याचा पुरेपूर वापर तेलगीने केला आणि हजारो कोटी रूपयांचा सरकारी महसुल पळवून नेला. 

भारतात कुठल्याही कारभारावर सरकारी शिक्कामोर्तब म्हणजे मुद्रांक चिकटवणे. परिणामी मुद्रांकांना मागणी प्रचंड आणि तुटवडा रोजचाच. त्यातूनच मुद्रांकाचा काळाबाजार फोफावला आणि तेलगीने बनावट मुद्रांकाचा धंदा थाटला. 

बंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतलेल्या तेलगीने बनावट मुद्रांक छपाईचा धंदा सुरू करण्यापूर्वी रेल्वेत अन्नपदार्थ विकण्यापासून अनेक छोटे-मोठे उद्योग केले. सौदी अरेबियात जाऊन काही काळ पैसा मिळवला. बनावट पासपोर्ट बनवले. मग बनावट मुद्रांक छपाई सुरू केली. 1991 आणि 1995 मध्ये त्याच्यावर मुंबईत गुन्हे दाखल झाले होते. मात्र, त्यावेळच्या अधिकाऱयांनी तेलगीच्या धंद्याकडे केलेल्या दुर्लक्षाची परिणी अखेरीस हजारो कोटींच्या गैरव्यवहारात झाली. 

रेल्वेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयाचा मुलगा असलेल्या अब्दुल करीम तेलगीच्या गैरव्यवहाराने अवघा देश हादरला होता. मुंबई पोलिसांनी 1991 मध्ये सर्वप्रथम त्याला फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक केली होती. मुंबईतच ट्रॅव्हल एजंट म्हणून तेलगी काही काळ काम करत होता. मुंबईत त्याने अंडरवर्ल्डशी सुत जुळवले आणि हळू हळू आपल्या गुन्हेगारीचे जाळे विस्तारले. 

तेलगीने 1994 मध्ये मुद्रांकाच्या व्यवहारात पाऊल टाकले. त्याने मुद्रांक विक्रेता म्हणून लायसन्स मिळविले आणि लगेचच नाशिक सिक्युरिटी प्रेसने मोडीत काढलेले एक मशिनही विकत घेतले. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसने मोडीत काढलेली मशिन एकापाठोपाठ एक विकत घेत तेलगीने बनावट मुद्रांक निर्मिती सुरू केली. त्याने याच प्रेसमधून मुद्रांक छपाईसाठी लागणारा विशिष्ट कागद आणि तांत्रिक मदतही मिळविली. सिक्युरिटी प्रेस ज्या पद्धतीने मुद्रांक छापायचे, तसेच मुद्रांक छापायचा धंदा तेलगीने थाटला. 

बनावट स्टँप पेपर, न्यायालयीन शुल्क स्टँप, महसुल स्टँप, विशिष्ट कारणांसाठी वापरलेले जाणारे वेगवेगळे स्टँप, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर ट्रान्स्फर सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स एजन्सीपर्यंत तेलगीच्या गैरव्यवहाराचा धंदा वाढला. बँका, इन्शुरन्स कंपन्या, शेअर बाजारातील दलाल आदींना तेलगी घाऊक पद्धतीने बनावट कागदपत्रे पुरवायचा. भारतात मुद्रांकाचा तुटवडा असतो; त्याचा गैरफायदा घेत त्याने आपला धंदा सर्वदूर पसरवला. त्याने या धंद्यासाठी तब्बल 350 कर्मचारी नेमले होते. 

पुण्यात बनावट मुद्रांक विकले जात असल्याची टीप दिल्लीचे तत्लाकिन पोलीस उपायुक्त विजय मलिक यांना जानेवारी 2003 मध्ये मिळाल्यानंतर तेलगीचे रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी फोन टॅपिंग सुरू केले आणि नोव्हेंबर 2003 मध्ये अजमेरमध्ये तेलगीला अटक झाली. तेलगीने सुमारे वीस हजार कोटी रूपयांचे बनावट मुद्रांक दहा वर्षांच्या कालावधीत विकले असल्याचा अंदाज आहे. कारण, रोजच्या रोज त्याचे एजंट तब्बल पन्नास हजार रुपयांच्या बनावट मुद्रांकाची विक्री करायचे. 

तेलगीला अटक झाल्यानंतर हा गैरव्यवहार दोन हजार कोटी रूपयांचा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक माहिती बाहेर येत गेली आणि एकूण गैरव्यवहार 26 हजार कोटी ते 32 हजार कोटी रूपयांचा असल्याचे उघडकीस आले. अटकेपूर्वी काही दिवस आधी त्याने मुंबईच्या ग्रँट रोडवर एका बारबालेवर तब्बल 93 लाख रूपये उधळल्याचेही तपासात समोर आले. 

पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात तेलगीविरुद्ध बनावट मुद्रांक प्रकरणात जून 2003 मध्ये गुन्हा दाखल झाला. चौकशी दरम्यान पोलिसांनी भिवंडीतून 2,200 कोटी रुपयांचे बनावट मुद्रांकही जप्त केले. त्यानंतर सरकारने तेलगीच्या चौकशीसाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी) स्थापन केली. एसआयटीच्या अहवालात नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमधील अधिकाऱयांवर ठपका ठेवण्यात आला; मात्र त्या अधिकाऱयांवर कोणतीही कारवाई झाली नाही. 

या प्रकरणाच्या चौकशीत सुरूवातीला सहभागी असणारे पोलीस अधिकारी प्रताप प्रभाकर काकडे यांचे 2005 मध्ये गुढरित्या मरण पावले. त्यांनी बनावट मुद्रांक छपाईची मशिन आणि बनावट मुद्रांक चौकशीच्यावेळी जप्त केलेले नसल्याचा आरोप होता. काकडे यांच्या मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकारी आणि कारागृहातील कर्मचाऱयांना अटक झाली; मात्र पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष सोडण्यात आले. 

तेलगीविरुद्धच्या सर्वच खटल्यांचा निकाल अजून लागेलेला नाही. त्याला 202 कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तेलगीला 13 वर्षे सश्रम कारावास आणि 202 कोटी रूपयांचा दंड अशी शिक्षा त्याला 29 जून 2007 मध्ये झाली. त्याच्यासोबतच्या 43 साथीदारांना कमीत कमी पाच वर्षे कारावासाची शिक्षा झाली. कारागृहात तेलगी आजारी पडला. त्याला भेटायलाही कोणी येत नसे. सुरूवातीच्या काळात त्याची पत्नी कारागृहात यायची. तीनेही नंतर येणे सोडून दिले. जूलै 2017 मध्ये निवृत्त पोलीस पोलीस उपमहानिरीक्षक डी रूपा यांनी तेलगीला कारागृह प्रशासन विशेष सवलती देत असल्याचा आरोप केल्यानंतर तेलगी पुन्हा चर्चेत आला होता. त्याला कारागृहातील तीन ते चार कर्मचारी मसाज आणि मालीश करतात, असा आरोप रूपा यांनी केला होता. तेलगीला एड्सही झाला असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. 

Web Title: Abdul Karim Telgi Marathi news counterfeit stamp scam