अब्दुल्लांच्या घरात मोटारीसह घुसणारा तरुण गोळीबारात ठार 

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पोलिसांनी अनेकदा विनंती केल्यानंतरदेखील संबंधित तरुण आतमध्ये मोटार घुसविण्याचा प्रयत्न करत होता, असेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे.

जम्मू : जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाभोवतीचे सुरक्षाकडे भेदत मोटारीसह आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चालकास सुरक्षा दलांनी आज ठार केले.

अब्दुल्ला पिता-पुत्र यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या अपघातात अन्य दोन वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) आहे. 

श्रीनगर मतदारसंघाचे नेतृत्व करणारे फारुख अब्दुल्ला दिल्लीतून श्रीनगरला परतत असतानाच ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. जम्मू शहराच्या बाहेर भाटिंडी भागात अब्दुल्ला यांचे निवासस्थान आहे. आज सकाळी सय्यद मुरफाद शाह या तरुणाने भरधाव मोटार निवासस्थानाच्या गेटवर धडकविली. ही धडक एवढी जबरदस्त होती, की काही क्षणांमध्ये ती मोटार फाटक तोडून आतील बागेत गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, चौकशी सुरू असल्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. 

घटना दुर्दैवी 

पोलिसांनी अनेकदा विनंती केल्यानंतरदेखील संबंधित तरुण आतमध्ये मोटार घुसविण्याचा प्रयत्न करत होता, असेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे. यावर वृत्तसंस्थेशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, की घडलेली घटना दुर्दैवी असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली आहे. पोलिसांनी या तरुणाने नेमके असे कृत्य का केले, हे शोधून काढावे. 

कुटुंबीयांचा दावा 

दरम्यान, संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार तो मुरफाद हा सकाळी जीमला गेला होता, तो अब्दुल्लांच्या घरात मोटारीसह कसा काय घुसला? त्याच्याकडे कोणतेही शस्त्र नसताना त्याला जवानांनी अटक न करता त्याच्यावर गोळीबार कसा काय केला? असा सवालही त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी अब्दुल्लांच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन केले. 

Web Title: Abdullahs Home entering youth shot dead