'मोदींकडे विश्वासार्हता नाही, इंदिरांशी तुलना अशक्य'

पीटीआय
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

'बिमारू' जुमला

बिमारू राज्य हा केवळ एक जुमला आहे. बिमारू म्हणजे काय हे तुम्ही मला सांगू शकता का? वस्तुतः मोदी हे खोटे बोलण्यात पटाईत आहेत. ते गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण करण्यात सध्या व्यग्र आहेत, असा आरोप गेहलोत यांनी केला. 

लखनौ : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विश्वासार्हतेचा अभाव असल्याने आपली पूर्वीचे स्थान पुन्हा मिळविण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. मोदी आणि इंदिरा गांधी यांची तुलना होणे शक्‍य नाही," असे मत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व उत्तर प्रदेश कॉंग्रेस समितीचे मुख्य समन्वयक अशोक गेहलोत यांनी व्यक्त केले.

गेहलोत म्हणाले, "इंदिरा गांधी यांचे वलय वेगळे होते. मोदींचे वलय संपुष्टात येत आहे. मतदारांच्या रागामुळे इंदिरा गांधी सुरवातीला एका निवडणुकीत बाहेर गेल्या होत्या. मात्र, नंतर त्यांना मतदारांनी स्वीकारले.
मोदींनाही एक संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी ती गमावली आहे. 
ते पुढे म्हणाले, "लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी यांसारख्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्यांनी बाजूला केले आहे. यामुळे भाजपमधील इतर नेत्यांची घुसमट होत असून, त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 
यामुळे मोदींच्या मनात नौराश्‍याची भावना खोलवर गेली आहे. असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना आल्याचे गेहलोत यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. 

कॉंग्रेसने कधीही सत्तेची पर्वा केली नाही. मात्र, दिल्ली आणि बिहारमधील निवडणुकांप्रमाणेच उत्तर प्रदेशातही भाजपची दयनीय अवस्था होईल, असे मत गेहलोत यांनी व्यक्त केले. 
 

Web Title: Absence of credibility haunting PM Modi: Ashok Gehlot