तरुणींची छेडछाड ही तोकड्या कपड्यांमुळेच: अबू आझमी

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

आज जितके कमी कपडे परिधान कराल तेवढे तुम्ही फॅशनेबल आहात असा समज आहे. जिथे साखर पडेल तिथे मुंग्या आपोआप येणारच. जर का माझी मुलगी, बहीण रात्री-अपरात्री अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीबरोबर 31 डिसेंबर साजरा करत असेल, आणि तेव्हा तिचा भाऊ किंवा पती बरोबर नसेल, तर हे बरोबर नाही

नवी दिल्ली - बंगळूरमध्ये नववर्ष साजरे करणाऱ्या तरुणींना त्यांनी परिधान केलेल्या तोकड्या कपड्यांमुळेच छेडछाडीला सामोरे जावे लागले, असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज केले. "जिथे पेट्रोल, तिथे आग लागणारच' अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

बंगळूरमध्ये झालेल्या छेडछाडप्रकरणी आपले मत व्यक्त करताना आझमी म्हणाले, ""आज जितके कमी कपडे परिधान कराल तेवढे तुम्ही फॅशनेबल आहात असा समज आहे. जिथे साखर पडेल तिथे मुंग्या आपोआप येणारच. जर का माझी मुलगी, बहीण रात्री-अपरात्री अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीबरोबर 31 डिसेंबर साजरा करत असेल, आणि तेव्हा तिचा भाऊ किंवा पती बरोबर नसेल, तर हे बरोबर नाही. याबद्दल मला कोणी चुकीचे म्हटले तरी मान्य; मात्र, हेच सत्य आहे.''

आझमींबरोबर कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्‍वरा यांनीही अशा प्रकारचे विधान करून रोष ओढवून घेतला आहे. ते म्हणाले, ""कितीही काळजी घेतली, तरी नाताळ व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर असे प्रकार घडतात.'' केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या विधानाची दखल घेत महिलांचे रक्षण करणे, हे सरकारचे दायित्व आहे, या शब्दांत त्यांची कानउघाडणी केली आहे.

विधाने भोवणार
अबू आझमी व जी परमेश्‍वरा यांनी केलेली वादग्रस्त विधाने त्यांना चांगलीच भोवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागत असून, राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी दोघांना समन्स बजावले आहे, अशी माहिती आयोगाच्या प्रमुख ललिता कुमारमंगलम यांनी ट्‌विटरद्वारे दिली.

माझ्या सासऱ्यांनी केलेले विधान जर का सत्य असेल, तर ते अत्यंत शरमनाक असून, त्याचा मला व फरहानला (अबू आझमींचा मुलगा) खेद आहे.
- आयेशा टाकिया, अभिनेत्री

Web Title: Abu Azmi blames women for wearing ‘short dresses’