AISA वर हल्ला करणाऱ्या दोघांना ABVPने केले निलंबित

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

या घटनेचा निषेध नोंदवत ABVPने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

नवी दिल्ली- अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) दोन समर्थक विद्यार्थ्यांवर दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कँपसमध्ये हल्ला करणाऱ्या दोघांना पोलिसांनी काल (मंगळवार) अटक केल्यानंतर त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आज संघटनेतून निलंबित केले.

विविध स्तरांतून टीका झाल्यानंतर या घटनेचा निषेध नोंदवत ABVPने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "आम्ही कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याच्या विरोधात आहोत, आणि कँपसमधील वातावरण हिंसाचारमुक्त असावे असेच आम्हाला वाटते."
    
"त्या घटनेनंतर ABVPच्या सदस्यांनी बैठक घेऊन निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. प्रशांत मिश्रा आणि विनायक शर्मा या दोन सदस्यांना नियम मोडल्याबद्दल आणि हिंसाचारात भाग घेतल्याबद्दल निलंबित केले आहे," असे संघटनेचा प्रवक्ता साकेत बहुगुणा याने निवेदनात म्हटले आहे. 
तसेच, या सदस्यांची संघटनेअंतर्गत चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील काय कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संघटनेने सांगितले. 

यापूर्वी, प्रशांत मिश्रा आणि त्याच्या सात-आठ साथीदारांनी राज सिंग आणि उत्कर्ष भारद्वाज यांच्यावर श्री गुरू तेगबहादूर खालसा कॉलेजमध्ये हल्ला करून पट्ट्याने गळा दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. 
 

Web Title: ABVP suspends two members