
Odisha Train Accident : मालगाडीमध्ये लोहखनिज असल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली; रेल्वे बोर्डाची पत्रकार परिषद
नवी दिल्लीः ओडिसातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा बळी गेला. तर ११०० हून अधिक जण जखमी झालेत. आज रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंट सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी ही पत्रकार परिषद घेतली. मालगाडीमध्ये लोहखनिज होतं, त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच प्राथमिक निष्कर्षांनुसार, सिग्नलिंगमध्ये काही समस्या होत्या. आम्ही अजूनही रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या सविस्तर अहवालाची वाट पाहत असून ट्रेनचा वेग सुमारे १२८ किमी होता असं स्पष्टीकरण वर्मा यांनी दिलं.
रेल्वेमंत्री काय म्हणाले?
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. तसेच याला जबाबदार असलेल्या लोकांचीही ओळख पटली असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांनी हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे झाल्याचा खुलासा केला.
'पंतप्रधान मोजींनी दिलेल्या सूचनांनूसार काम वेगाने सुरू आहे. काल रात्री ट्रॅकचे काम जवळजवळ पूर्ण झाले. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व डबे काढण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत' असं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं.