Loksabha 2019: वृत्तवाहिन्यांकडून नरेंद्र मोदींना झुकते माप! 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 मे 2019

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) च्या अहवालानुसार पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण 722 तास 25 मिनिटे व 45 सेकंद दिसले. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांपेक्षा एक सभा जास्त घेतली; मात्र त्यांना टीव्हीवर मोदींपेक्षा कमी वेळ मिळाला. राहुल यांना वाहिन्यांनी 251 तास, 36 मिनिटे, 43 सेकंदांचा वेळ चमकावले आहे. 
 

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळा झळकवल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) च्या अहवालानुसार पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण 722 तास 25 मिनिटे व 45 सेकंद दिसले. त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांपेक्षा एक सभा जास्त घेतली; मात्र त्यांना टीव्हीवर मोदींपेक्षा कमी वेळ मिळाला. राहुल यांना वाहिन्यांनी 251 तास, 36 मिनिटे, 43 सेकंदांचा वेळ चमकावले आहे. 

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना 123 तास, 39 मिनिटे व 45 सेकंद आणि कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना 84 तास, 20 मिनिटे व 5 सेकंदांचा वेळ मिळाला. पंतप्रधानांनी 1 ते 28 एप्रिल दरम्यान देशभर 64 प्रचारसभा घेतल्या. या चार आठवड्यांत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 65 सभांना संबोधित केले. देशातील प्रमुख 11 हिंदी वृत्तवाहिन्यांवर राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती अधिक आहे. मोदींमुळे जास्त टीआरपी मिळतो, या कारणाने त्यांना जास्त वेळ दिला गेल्याचे बोलले जात आहे. 
विश्‍लेषकांच्या मते, मोदींनी वाहिन्यांकडून झुकते माप दिले गेले, असे म्हणणे कठीण आहे. 25 एप्रिल रोजी वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी मोदींनी केलेल्या रोड शोचे सुमारे साडेतीस तास लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्या वेळी त्यांच्याशी झालेली चर्चाही बराच वेळ दाखवण्यात आली. तर राहुल गांधींची प्रचारादरम्यान घेतलेली मुलाखत फक्त 25 मिनिटे दाखवण्यात आली. एएनआयसाठी अक्षयकुमारने पंतप्रधान मोदींची मुलाखती घेतली, त्याचेही सर्व वाहिन्यांवर एकाच वेळी प्रक्षेपण करण्यात आले. ते 1.7 कोटी प्रेक्षकांनी पाहिले. लंडनमध्ये "भारत की बात'मध्ये प्रसून जोशी यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली मुलाखत 2.5 कोटी लोकांनी पाहिली होती. तसेच अक्षयकुमार यांनी घेतलेली मुलाखत प्रेक्षकांनी जास्त वेळ पाहिली. त्याचे मोजमाप इम्प्रेशनने केले जाते. मोदी-अक्षय कुमार यांच्या मुलाखतीत हे प्रमाण 52 लाख; तर "भारत की बात'साठी 35 लाख राहिले होते. 
बीएआरसी डाटानुसार, मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे भाषणही वाहिन्यांनी बराच वेळ दाखवले. 2016 मध्ये मोदींचे भाषण 137 वाहिन्यांवर 11.7 कोटी, 2017 मध्ये 147 चॅनल्सवर 10.9 कोटी व 2018 मध्ये 147 वाहिन्यांवर 12.1 कोटी प्रेक्षकांनी पाहिले. 
--------------------- 
जे करायला हवे तसे होत नाही : अभिनंदन शेखरी 
वेळेचा हा मुद्दा अप्रासंगिक आहे. मात्र वाहिन्यांनी जे करायला हवे तसे होत नाही. काहींचा अपवाद सोडला तर सर्वच पक्षनेत्यांना आम्ही समान वेळ देतो, असा वाहिन्यांचा दावा आहे. परंतु सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील बातम्या सौम्य व विरोधकांच्या आक्रमकपणे दाखवल्या जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे, असे मत न्यूज लॉन्ड्रीचे प्रमुख अभिनंदन शेखरी यांनी नोंदवले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: According to BRC report news channels are favoring narendra Modi