सोनिया, राहुल गांधींना तुरुंगात का नाही टाकले?; काँग्रेस नेत्याचा प्रश्न

Adhir Ranjan Chaudhary
Adhir Ranjan Chaudhary

नवी दिल्ली : गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले ही वस्तुस्थिती आहे; परंतु दररोज सोनिया गांधी, राहुल गांधींना चोर म्हणत मोदी सरकार सत्तेत आले; परंतु पाच वर्षे होऊनही सोनिया गांधी, राहुल गांधींची चौकशी का नाही केली, त्यांना तुरुंगात का नाही टाकले? अजूनही ते बाहेर का आहेत?, असा प्रश्न काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला.

राष्ट्रपती अभिभाषणाच्या निमित्ताने भाजप आणि कॉंग्रेसदरम्यान जोरदार चिखलफेक निवडणुकीनंतर आज पुन्हा एकदा दिसली. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना स्वामी विवेकानंदांशी केली; तर "गंगा नदीची तुलना घाणेरड्या नाल्याशी कशी होऊ शकते, अशी खळबळजनक टिप्पणी कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी केली. एवढेच नव्हे, तर सोनिया गांधी, राहुल गांधी दोषी असतील तर त्यांना तुरुंगात का टाकले नाही, असे आव्हानही दिले. 

लोकसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. पहिल्यांदाच लोकसभेवर येऊन मंत्री झालेले ओडिशाचे प्रतापचंद्र सारंगी यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला. सारंगी यांनी पंतप्रधान मोदींची तुलना स्वामी विवेकानंदांशी करणारी स्तुतिसुमने उधळून कॉंग्रेसला लक्ष्य केले. कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करावे आणि मोदींची माफी मागावी, या सारंगी यांच्या सल्ल्यामुळे कॉंग्रेस खासदार संतप्त झाले होते. भारताचे तुकडे करू पाहणाऱ्या गॅंगला, तसेच वंदे मातरम्‌ म्हणण्यास नकार देणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे काय, असाही सवाल मंत्री सारंगी यांनी केला, तर नंदुरबारच्या खासदार हीना गावित यांनी प्रस्तावाच्या अनुमोदनात आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येचा उल्लेख केला. भाजपवर दलित विरोधाचा आरोप झाला; परंतु निवडणुकीत सर्व राखीव जागांवर भाजपचे संख्याबळ वाढले आणि विरोधकांच्या तरुण नेत्याला "खानदानी मतदार संघ' सोडून पळ काढावा लागला, असाही चिमटा गावित यांनी काढला. 

प्रत्युत्तरादाखल कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांवर मोदीस्तुतीबद्दल आक्रमक शब्दांत प्रहार केले. मर्यादा ओलांडून केलेली स्तुती हास्यास्पद ठरते. "केवळ नरेंद्र या नावाने स्वामी विवेकानंद आणि मोदींमध्ये समानता होऊ शकत नाही. "गंगा नदीची घाणेरड्या नाल्याशी तुलना होऊ शकत नाही', असा हल्ला अधीर रंजन यांनी चढवला. आम्ही मोदींचा आदर करतो; परंतु साधू आणि राक्षसाची तुलना करण्यासाठी भाग पाडू नका, असेही त्यांनी डिवचल्यामुळे भाजप खासदार संतप्त झाले होते. अखेर असंसदीय शब्द तपासून कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश पीठासीन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर वातावरण शांत झाले. 

पंतप्रधान मोदी हे उत्कृष्ट सेल्समन आहेत. 2014 मध्ये आमचा पक्ष जनतेला माल विकण्यात अपयशी ठरला; परंतु माल चांगला असो अथवा नसो, भाजप माल विकण्यात यशस्वी ठरला, अशीही कोपरखळी त्यांनी लगावली. भाजपचे खासदार जनतेच्या प्रश्‍नांवर पूर्णपणे उदासीन आहेत. "मोदीबाबा आपली नौका पैलतीराला नेतील', या भरवशावर आहेत. म्हणूनच मोदींची स्तुती त्यांनी आरंभली आहे, असा टोला लगावताना अधीर रंजन चौधरी यांनी कॉंग्रेसचे खासदार कमी असले तरी जनतेच्या प्रश्‍नांवर संघर्ष थांबविणार नाहीत, असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. देशात आतापर्यंत झालेला विकास कॉंग्रेसमुळेच झाल्याचा दावा करताना पंचवार्षिक योजनेपासून ते अणुस्फोटापर्यंतची जंत्री मांडली. सोबतच, कॉंग्रेसच्या योजनांची नाव बदलून मोदी सरकार स्वतःच्या योजना असल्याचे दाखवत आहे, हे "राजकीय वाङ्‌मयचौर्य' असल्याचे फटकारले. 

अभिनंदनच्या मिशा राष्ट्रीय मिशा जाहीर करा 
कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या भाषणात आगळीवेगळी मागणी करून सभागृहाचे लक्ष वेधले. बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत शिरून विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पुरस्कार दिला जावा, अशी मागणी केली. एवढेच नव्हे, तर अभिनंदनच्या मिशा या राष्ट्रीय मिशा म्हणून जाहीर कराव्यात. यातून तरुणांना प्रेरणा मिळेल, अशीही सूचनावजा मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com