'विराट'चा युगान्त!

आदित्य वाघमारे 
सोमवार, 6 मार्च 2017

भारतीय झेंड्याखाली 30 वर्षे सेवा बजावल्यानंतर आज (सहा मार्च) आयएनएस विराट निवृत्त होत आहे. जगाच्या 27 वेळा प्रदक्षिणा होईल एवढे अंतर या नौकेने पार केले आहे. जलमेव यस्य बलमेव तस्य या घोषासह देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या आयएनएस विराटच्या कार्यकाळात हिंद महासागर शांत राहीला ही देखील या युद्धनौकेची उपलब्धीच म्हणावी लागणार आहे. 

हिंदी महासागरात तब्बल तीन दशके खडा पहारा देणारी आयएनएस विराट ही युद्ध नौका आपल्या देशसेवेला पुर्णविराम देणार आहे. 6 मार्च 2017 ला निवृत्त होणाऱ्या आयएनएस विराट या युद्धनौकेने देशाच्या सागरी सीमांना पोलादी संरक्षण पुरवत भारतीय नौदलाचा हिंद महासागरातील दरारा कायम राखण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. या युद्धनौकेचा अंतिम ठिकाणा अद्याप नक्की झाला नसला तरी यावर काम केलेल्या प्रत्येकाच्या मनात आणि हिंद महासागराच्या पाण्यात तिचा दरवळ कायम राहणार आहे. तब्बल 50 वर्षे जगाचे महासागर पालथे घालणाऱ्या आयएनएस विराटची निवृत्ती ही एक युगान्त ठरेल. 

आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सेवा बजावत असताना हिंद महासागरावर आपला वरचष्मा कायम राखता यावा यासाठी भारतीय नौदलाचा दुसऱ्या दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची गरज 80 च्या दशकात भासली. त्याच्या आधारावर सुरू झालेला शोध हा युनायटेड किंगडमच्या एचएमएस हर्मस विराटचे जुने नाव या युद्धनौकेवर येवून थांबला. द्वितीय विश्‍वयुद्धादरम्यान 1943 साली या युद्धनौकेचा आराखडा तयार करण्यात आला होता. 

विकर्स शिपयार्ड येथे 1959 साली तयार करण्यात आलेली एचएमएस हर्मस ही युद्धनौका 1959 ते 1970 दरम्यान युकेसाठी आघाडीची युद्धनौका राहीली होती. आज आयएनएस विराटमध्ये कार्यरत असलेले बॉयलर आणि अन्य मुख्य यंत्रणा या द्वितीय विश्‍वयुद्धा दरम्यान घडवल्या गेल्या होत्या. असे असले तरी ही यंत्रणा आजही त्याच ताकदीने काम करतात. आज नव्या तंत्रज्ञानाची कास धरत तयार करण्यात आलेल्या विमानवाहू युद्धनौकांमध्ये असे उदाहरण मिळणे कठीण आहे. हे या युद्धनौकेची निर्मिती करणाऱ्यांचे यश आहेच पण ज्यांनी भारतीय नौदलात या युद्धनौकेचा सांभाळ केला त्यांनाही या नौकेच्या आजच्या उत्कृष्ट परिस्थितीबाबत श्रेय जाते. 465 मिलीयन डॉलर किमतीत विकत घेण्यात आलेली आयएनएस विराटची सेवा ही पुढे पाच ते दहा वर्षांची राहील असा अंदाज होता पण सगळे आडाखे खोटे ठरवत आयएनएस विराटने तब्बल 30 वर्षे देशसेवा बजावली. एवढी जुनी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवणे हे नक्कीच सोपे काम नाही. 1977 साली या युद्धनौकेत पहिल्या हॅरीयर या लढाऊ विमानाने झेप घेतली ज्याची डरकाळी 2016 पर्यंत हिंद महासागरात कायम राहीली. यापूर्वी विराटने सी विक्‍सन इंटरसेप्टर, गॅनेट, व्हर्लविंड हेलीकॉप्टरला भरारी देण्याचे काम रॉयेल नेव्हीत केले होते. सत्तारीच्या दशकात ही युद्धनौका कमांडो कॅरियरच्या रूपाने खुल्या समुद्रात आली. त्याच्यानंतर या दशकाच्या उत्तरार्धात तिने पाणबुडी विरोधी हेलीकॉप्टर उडवण्यासाठीही स्वतःला सज्ज केले होते. 

फॉल्कलॅण्ड युद्धातील कामगिरी 
1981 साली सुमारे शंभर दिवस चाललेल्या फॉल्कलॅण्ड युद्धात युकेपासून 9000 समुद्री मैल लांब अर्जेंटीना सोबत झालेल्या युद्धात ब्रिटीश लष्कर आणि नौदलाच्या कारवाईची सूत्रे एचएमएस हर्मस्‌वरुन हालली. याबरोबर हॅरीयर विमानांनी हर्मस वरून झेप घेत शत्रूची 23 विमाने जमीनदोस्त केली होती. 

गढवाल रायफल्ससोबत ऑपरेशन ज्युपिटर 
फॉल्कलॅण्ड मध्ये लष्कराच्या साथीने केलेल्या संयुक्त कारवाईची पुनरावृृत्ती करण्याची संधी आयेनएस विराटचा पुनश्‍च 1989 साली. श्रीलंकेत पेटलेल्या रणात गढवाल रायफल्सच्या जवानांना श्रीलंकेत नेण्याची कामगिरी विराटला सोपविण्यात आली. पावसाळी आणि विपरित वातावरण असताना एका रात्रीतून विराटला सज्ज केले गेले आणि लगोलग ते केरळच्या तटावर थडकले. 76 पेक्षा जास्त फेऱ्यां करत विराट तसेच हेलीकॉप्टरांनी 350 जवान त्यांच्या सगळ्या सामुग्रीसहित युद्धभूमीवर उतरवले होते. 

पराक्रममध्ये गाजवला पराक्रम 
13 डिसेंबर 2001 साली भारताच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर युद्धाचे ढग जमायला सुरू झाली. ही सज्जता केवळ भूमीवर नाही तर समुद्रातही करण्यात आली होती. सुमारे दहा महिने ही युद्धनौका कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी सज्ज राहीली. हिंद महासागरातून खाडीकडे जाणाऱ्या जहाजांची नाकाबंदी करण्याचे महत्त्वाचे काम आयएनएस विराटने केले होते. ज्याच्यामुळे भारतीय नौदलाचा धाक हा आजही कायम आहे. 

भारताला दिले पाच नौदलप्रमुख 
आयएनएस विराट या युद्धनौकेला आत्तापर्यंत 22 कमांडर लाभले आहेत. 8 मे 1987 साली कॅप्टन विनोद पसरीचा यांनी या युद्धनौकेचे पहिले कमांडरपद भुषवले होते. देशाच्या आत्तापर्यंतच्या 23 नौदलप्रमुखांपैकी 5 जणांनी आयएनएस विराटचे कमांडर म्हणून काम पाहीले आहे. यात ऍडमीरल (नि.) माधवेंद्र सिंग (तत्कालीन कॅप्टन) हे पहिले. विराटला कमांड करणारे आणि नौदलाचे प्रमुख विराटचे नेतत्व करणारे आणि नंतर नौदलाचे प्रमुख झालेले पाच अधिकारी आणि त्यांचा विराटवरील कार्यकाल पुढीलप्रमाणे : 
- (नि.) ऍडमिरल माधवेंद्र सिंग ( 16 डिसेंबर 88 ते 30 ऑग. 90) 
- (नि.) ऍडमिरल अरूण प्रकाश (31 ऑगस्ट 90 ते 26 डिसें. 91) 
- (नि.) ऍडमिरल निर्मलकुमार वर्मा (9 नोव्हें. 1996 ते 13 डिसें. 97) 
- (नि.) ऍडमिरल डि. के. जोशी (17 डिसें. 2001 ते 8 जाने. 2003) 
- ऍडमिरल गिरीश लुथरा (17 मे 2006 ते 11 ऑगस्ट 07) 

कॅप्टन पुनित चड्डा शेवटचे कर्णधार 
भारतीय नौदलात 1 जुलै 1987 साली दाखल झालेले कॅप्टन पुनीत चड्डा हे आयएनएस विराटचे शेवटचे कर्णधार ठरले आहेत. ऑपरेशन पवन नंतर आयएनएस आग्रे वर नॅव्हीगीटींग ऑफीसर म्हणून काम त्यांनी केले. त्याच्यानंतर त्यांनी आयएनएस रणजित, अभय आणि रणवीर, आयएनएस विभुती, आयएनएस निरीक्षक आदी नौकांवर काम करण्याचा अनुभव मिळवला आहे. 23 ऑक्‍टोबर 2015 ला त्यांनी आयएनएस विराटचे नेतृत्व स्वीकारले होते. 

अवयवदानाचे पुण्य आयएनएस विराट्‌च्या पदरी 
आयएनएस विराट ही दुसऱ्या विश्‍वयुद्धात तयार करण्यात आलेली यंत्रणा असली तरी त्यातील सगळेच भाग आज सुस्थितीत आहेत. यातील काही अवयवांचे दान विराट अन्य जहाजांना करणार आहे. त्यात प्रामुख्याने या युद्धनौकेच्या संरक्षण देणाऱ्या बराक सिस्टीमचा सहभाग राहणार आहे. या युद्धनौकेचे बॉयलर सुस्थितीत असले तरी त्यांना काढणे सोयीचे राहणार नसल्याने संपूर्ण युद्धनौकेच्या भवितव्यावर या उर्वरित भागांचे भविष्य अवलंबून राहणार आहे. 

शेवटची सफर 23 जुलै 2016 ला 
देशाची दुसरी विमानवाहू युद्धनौका असलेल्या आयएनएस विराटच्या सलग 30 वर्षे चालू स्थितीत ठेवण्याचे मोठे काम देशातील डॉकयार्डने केले आहे. एखाद्या नौकेचे आयुष्य संपल्यावरही त्यांचा वापर कसा करायचा. त्यांना सुस्थितीत कसे राखायचे ही कला भारतीय नौदलाकडे आहे. त्याच्याशिवाय विराटने एवढा काळ महासागरांमध्ये काढणे कठीण होते. स्टीम बॉयलरवर पुढे सरकण्याचे बळ मिळणाऱ्या आयएनएस विराटने कोचीन बंदरापर्यंतचा प्रवास स्वबळाने केला होता. हा प्रवास तिचा अंतिम ठरला होता. 

दृष्टीक्षेपात आयएनएस विराट 

 • भारतीय झेंड्याखाली 30 वर्षे सेवा, मुंबईत 6 मार्चला सेवेला मिळणार पूर्णविराम
 • जलमेव यस्य बलमेव तस्य हे घोषवाक्‍य
 • कमी रनवेच्या जोरावर टेक ऑफ आणि हेलिकॉप्टर सारखे जागेवर लॅण्डींग करण्याची क्षमता असलेल्या सी हॅरीयरची दमदार साथ
 • सी किंग (ब्रिटीश बनावट) कमोव्ह 31 (रशियन), धृव (भारतीय) हेलीकॉप्टरचे आयएनएस विराटवर वास्तव्य
 • 22,622 तासांच्या जंबो हवाई उड्डाण
 • 2282 दिवस समुद्रात घालवले 
 • 10 लाख 94 हजार 215 किलोमीटरचा एकूण जलप्रवास
 • 80,715 तास चालले बॉयलर
 • चालू स्थितीत असलेल्या सगळ्यात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून गिनीज बुकात नोंद
 • भारतीय लष्करासह अनेक यशस्वी ऑपरेशनमध्ये सहभाग
 • युद्धाभ्यास मलबार (अमेरिका) युद्धाभ्यास वरूणा (फ्रान्स) 
 • नसीम अल बहार (ओमान) याशिवाय अन्य युद्धाभ्यासात सहभाग 
 • पश्‍चिमी ताफ्याची सर्वोत्तम नौका म्हणून चारवेळा गौरव 
 • सलग तीन महिने समुद्रात मुक्कामी राहण्याची क्षमता 
 • 9 मेगावॉट वीजनिर्मिती करणारी यंत्रणा विराटमध्ये 
 • 150 अधिकारी, 1500 खलाशींचा चमु या युद्धनौकेवर
 • 30 सी हॅरीयर लढावू विमाने राहण्याची क्षमता 
 • 220 मी. लांब, 45 मीटर रुंद
Web Title: Aditya Waghmare writes about India's best battleship INS Virat