आदित्यनाथांनीच मागितले दोन उपमुख्यमंत्री: नायडू

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

उत्तर प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उघडपणे राज्यासाठी दोन उपमुख्यमंत्री मागितल्याची माहिती भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उघडपणे राज्यासाठी दोन उपमुख्यमंत्री मागितल्याची माहिती भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. शपथविधीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, "योगी आदित्यनाथ हे प्रामाणिक आहेत. त्यांच्या बांधिलकीवर कोणीही बोट दाखवू शकत नाही. शिवाय एकाच मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येणे सोपी गोष्ट नाही. उत्तर प्रदेश हे खूप मोठे राज्य असल्याने दोन उपमुख्यमंत्री आवश्यक असल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले.'

उपमुख्यमंत्रीपदी केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान भाजपमधील नेत्यांनी आदित्यनाथ यांची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे आणि माझे लहान बंधू आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणे या एकविसाव्या शतकातील सर्वात चांगल्या बातम्या आहेत', अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Adityanath openly asked for 2 deputy CMs - Naidu