मतांसाठी गरीब आणि गरजू मुलांना दत्तक घ्या ; आनंदीबेन यांचा अजब सल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

मते अशाने मिळत नाहीत. त्यांच्याकडे जावा आणि बोला. त्यांची कशाप्रकारे काळजी घेण्यात येते हे त्यांना दाखवा.

- आनंदीबेन पटेल, राज्यपाल, मध्यप्रदेश

चित्रकूट : मतांसाठी गरीब आणि गरजू मुलांना दत्तक घ्या, असा अजब सल्ला मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन यांनी भाजप नेत्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकारण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे. देशात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता यावी, यासाठी भाजप नेत्यांनी गरीब आणि गरजू मुलांना दत्तक घ्यावे, असे त्या म्हणाल्या.

आनंदीबेन पटेल सध्या चित्रकोटच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना हा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, तुम्हाला मते तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही गरजू आणि गरीब मुलांना दत्तक घ्याल. महापौरांनी एक अभियान राबविण्यासाठी सुरु केले आहे. आम्ही गरजू मुलांना बालसंगोपन केंद्रातून दत्तक घेतले, असे सांगण्यात आले होते. त्यावर पटेल म्हणाल्या, मते अशाने मिळत नाहीत. त्यांच्याकडे जावा आणि बोला. त्यांची कशाप्रकारे काळजी घेण्यात येते हे त्यांना दाखवा, असे पटेल म्हणाल्या. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

त्यानंतर विरोधकांनी आनंदीबेन पटेल यांच्यावर टीकास्त्र सोडले. पटेल या संविधानिक पद उपभोगत असून, त्यांच्याकडील सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यावर काँग्रेसकडून आक्षेप घेतला जात आहे. राष्ट्रपती भवनाकडे याबाबत तक्रार करणार असून, आनंदीबेन पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Adopt poor and needy children to get votes says MP Governor Anandiben Patel give advice to BJP leaders