वस्तू व सेवांच्या बदल्यात करा जाहिरात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार करणाऱ्या भारतीय रेल्वेने आता जाहिरातींबाबतदेखील तितकेच प्रोफेशनल होण्याचा निर्धार केला आहे. आता विविध कंपन्यांना रेल्वेमध्ये त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करता येईल; पण त्याबदल्यात त्यांना रेल्वेतील प्रवाशांना संबंधित उत्पादनांची सेवा उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यामुळे भविष्यामध्ये गाडीत ज्या कंपनीच्या साबणाची जाहिरात लावण्यात आली आहे, तोच साबण स्वच्छतागृहामध्ये आढळून आल्यास आश्‍चर्य वाटू देऊ नका. 

यासंबंधीच्या धोरणाचा मसुदा रेल्वे मंडळाच्या "ट्रान्सफॉर्मेशन सेल'ने तयार केला असून, यामध्ये कंपन्यांना जाहिरातीच्या मोबदल्यात ग्राहकांना वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वे मंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली असून, सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या संदर्भातील दिशानिर्देश 27 डिसेंबर रोजीच रेल्वेच्या सर्व महाव्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. 

आकर्षक डील 

वस्तूविनिमय पद्धतीच्या धर्तीवरच या प्रयोगाची अंमलबजावणी केली जाणार असून, यात कोठेही पैशांचा व्यवहार केला जाणार नाही. दररोज रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जाहिरात करता येऊ शकते. कंपन्यांसाठी हे आकर्षक डील असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

माहिती ऑनलाइन 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून जाहिरातीच्या ऑफर मिळाल्यानंतर त्यांना यासंबंधीची माहिती 21 दिवसांसाठी संकेतस्थळांवर मांडावी लागेल, यामुळे सर्वांना समान संधी मिळू शकेल. यानंतर प्रशिक्षण विभागातील मुख्य अधिकारी निर्धारित वेळ संपल्यानंतर एका पार्टीला आमंत्रित करून तिला जाहिरात करण्याची परवानगी देतील. रेल्वेचा प्रमुख अधिकारी तीन महिन्यांसाठी दोन गाड्यांमध्ये कंपनीस जाहिरात करण्याची परवानगी देऊ शकतो. 

वस्तूंना प्राधान्य 

सुरवातीच्या टप्प्यात सेवांपेक्षाही वस्तूंच्या जाहिरातीला प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये साबण, चादरी अन्य वापरण्यायोग्य किरकोळ उपयुक्त वस्तूंचा समावेश असेल. कंपन्यांनी त्यांची उत्पादने मोफत वाटावीत, त्या बदल्यात आम्ही त्यांना त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी जागा देऊ, असे आम्हाला अपेक्षित असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. विशेष म्हणजे कंपन्यांनाही त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी सहा इंच बाय सहा इंच एवढीच जागा दिली जाईल.

Web Title: Advertise in exchange for goods and services