आठ तासांनी थरारनाट्य संपलं! उत्तर प्रदेशातील माथेफिरूचा खात्मा; 15 मुलांची सुटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

उत्तर प्रदेशातील फर्रूखाबाद येथे काल (ता. 30) संध्याकाळी सुरू झालेलं ओलीस नाट्य अखेरीस संपलं. ज्या माथेफिरूने 15 मुलांना बर्थडे पार्टीच्या नावाखाली डांबून ठेवलं होतं, त्याचा उत्तर प्रदेश पोलिसांनी खात्मा केला.

फर्रूखाबाद : उत्तर प्रदेशातील फर्रूखाबाद येथे काल (ता. 30) संध्याकाळी सुरू झालेलं ओलीस नाट्य अखेरीस संपलं. ज्या माथेफिरूने 15 मुलांना बर्थडे पार्टीच्या नावाखाली डांबून ठेवलं होतं, त्याचा उत्तर प्रदेश पोलिसांनी खात्मा केला. 8 तासांच्या ओलिसनाट्यानंतर अखेर या 15 मुलांची सुटका करण्यात पोलिस यशस्वी झाले आहे. पोलिसांसह एनएसजी कमांडोही या कारवाईत सहभागी होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी अधिकृतपणे एएनआयला ही माहिती दिली.

धक्कादायक! बर्थडे पार्टीला बोलवून त्यानं 15 मुलांना ठेवलं डांबून

फर्रूखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद कोतवाली क्षेत्रातील कथरिया या गावातील सुभाष गौतम याच्या मुलीचा आज वाढदिवस होता. त्यासाठी आजूबाजूची 20 मुले वाढदिवसासाठी आली होती. मुलीचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर सुभाषने अचानक सर्व मुलांना घरातील तळघरात कोंडले आणि घराच्या गच्चीवर चढला आणि जोरजोराने ओरडू लागला. आजूबाजूंच्या लोकांनी एकत्र येत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने समजावण्यास आलेल्या मित्रावरच गावठी बंदुकीतून गोळीबार केला. माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. जवळ आले तर घर उडवून लावण्याची धमकी त्याने दिली. 10 ते 12 वर्षे वयोगटातील मुले असल्याने पोलिस आणि गावकरी जोखीम घ्यायला तयार नव्हते. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. सुभाष गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर चोरी, लूटमारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

Image

 

उत्तर प्रदेश पोलिसांनी एनएसजी कमांडोंसह या निष्पाप मुलांची सुटका केली. संपूर्ण गाव तणावाखाली असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष बैठक बोलावून लगेच कारवाई करण्याचे आदेश दिले. अखेर 8 तासांच्या थरारानंतर हे नाट्य संपले. सुभाषच्या घरातून एक रायफल आणि काही गावठी पिस्तुलं जप्त करण्यात आली आहे. सुभाषने पोलिसांवरही गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचेच ऐकले नाही. अखेर त्याचा खात्मा करत पोलिसांनी मुलांची सुटका केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुभाष गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. यापूर्वी 2001 मध्येही त्याने एका व्यक्तीची हत्या केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता, अशी माहिती पोलिस अधिकारी ओ. पी. सिंह यांनी दिली. मुलांची सुखरूप सुटका केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांना 10 लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 8 Hours Operation masum successful police killed kidnapper and Rescued 15 Children UP