
- महाराष्ट्राकडूनही मागणी
- पाच राज्यांकडून होत आहे मागणी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत येत्या 3 मेनंतर संपत आहे. मात्र, तत्पूर्वी भारतातील काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवावा, यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. त्यामुळे आता देशातील काही राज्यात लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्वच व्यवहार (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद आहेत. मात्र, लॉकडाऊननंतरही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत नाहीये. त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्याची मागणी अनेक राज्यांकडून केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रासह इतर काही राज्यांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या दिल्ली सरकारच्या विशेष समितीने राजधानी दिल्लीत 16 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता आणखी पाच राज्यांनी अशीच मागणी केली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महाराष्ट्राकडूनही मागणी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढती संख्या पाहता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील 92 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण फक्त मुंबई-पुण्याचे असल्याची माहिती मिळत आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये 18 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहावेत, अशी टोपे यांची मागणी आहे.
पाच राज्यांकडून होत आहे मागणी
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या पाच राज्यांकडून लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी केली जात आहे. या राज्य सरकारांनी ही मागणी केली असली तरीदेखील यावर अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहमतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तेलंगणात 7 मेपर्यंत लॉकडाऊन
तेलंगणा राज्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या घोषणेपूर्वीच लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन असेल मात्र तेलंगणात 7 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.