...यामुळे वकिलांनी केले आंबेडकरांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

या आधी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडातील एका पुरातन मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा अनुरागी या दर्शनासाठी गेल्यानंतरही असाच प्रकार घडला होता.

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील काही दलित वकिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दूध व गंगाजलाचा अभिषेक घालून शुद्धीकरण केले. भारतीय जनता पक्षाचे राज्य सचिव सुनिल बंन्सल यांनी शुक्रवारी (ता. 10) या पुतळ्याला हार घातला होता. बन्सल यांनी हार घातल्यानंतर तो पुतळा मलिन झाला, असे या वकिलांचे म्हणणे आहे.

मेरठच्या जिल्हा न्यायालयाजवळ असलेल्या या बाबासाहेबांच्या पुतळ्याला भाजपच्या नेत्याने हार घातल्यामुळे हा प्रकार घडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राकेश सिन्हा यांनीही या पुतळ्याला हार घातला आहे, त्यामुळे पुतळ्याचे शुद्धीकरण व्हावे यासाठी आम्ही पुतळ्याला दुधाचा अभिषेक केला. भाजपची दलितांवर दडपशाही सुरू आहे. बाबासाहेबांचे नाव हे फक्त पक्षाच्या प्रसिद्धीसाठी वापरले जाते, असाही आरोप त्यांनी केला.  

या आधी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडातील एका पुरातन मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा अनुरागी या दर्शनासाठी गेल्यानंतरही असाच प्रकार घडला होता. दर्शन घेऊन गेल्यानंतर हे मंदिर गंगेच्या पाण्याने धुतले गेले, तर मंदिरातील मूर्ती ही इलाहाबादमध्ये पवित्र करण्यासाठी पाठवली गेली. या मंदिरात महिलांना प्रवेश नसल्याने अनुरागी या मंदिरात येऊन गेल्यावर हे मंदिर शुद्ध करण्यात आले.  

Web Title: after garland statue of babasaheb ambedkar lawyers purified it with milk in meerut uttar pradesh