तूरडाळीच्या आयातीवर निर्बंध

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

तूरडाळीची आयात प्रामुख्याने म्यानमार, मलावी, मोझांबिक आणि टांझानिया या देशांतून होते.

नवी दिल्ली : देशात झालेले विक्रमी उत्पादन आणि त्यामुळे किमती कोसळू नयेत व भाव स्थिर राहावेत यासाठी सरकारने तूरडाळीच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार वर्षाला दोन लाख टन तूरडाळ आयात करण्याची मुभा देण्यात आली आहे. "डीजीएफटी'तर्फे जारी अधिसूचनेत या निर्णयाची माहिती देण्यात आली.

अधिसूचनेनुसार सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या आयातीला हे निर्बंध लागू होणार नाहीत. कारण सरकारला विविध अशा द्विपक्षीय किंवा विभागीय करारांनुसार अशा वस्तूंची आयात करावी लागत असते. भारतातील डाळीचे उत्पादन हे मागणीच्या तुलनेत कमी असल्याने भारताला डाळी आयात कराव्या लागतात. डाळ आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत हा आघाडीवरचा देश आहे. तूरडाळीची आयात प्रामुख्याने म्यानमार, मलावी, मोझांबिक आणि टांझानिया या देशांतून होते.

देशात जवळपास सव्वादोन कोटी टन डाळींचे उत्पादन होत असते व त्यापैकी पंधरा टक्के तुरीच्या डाळीचे उत्पादन असते. भारतीय आहारात तूरडाळीचे स्थान प्रमुख आहे व त्यामुळे या डाळीस मागणीही मोठी असते. गेल्या वर्षी डाळींचे भाव वाढू लागल्यानंतर सरकारने विविध देशांबरोबर डाळीच्या आयातीसाठी दीर्घकालीन करार करून ठेवले आहेत. परंतु चांगल्या पावसामुळे डाळींचे उत्पादन भरघोस आले; पण त्यातून भाव कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

Web Title: agriculture news tur dal import pulses market