विहिंप नेते प्रवीण तोगडिया बेशुद्धावस्थेत सापडले

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जानेवारी 2018

अहमदाबाद - विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया आज रात्री येथे बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. त्यांच्यावर सध्या येथील चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.

तोगडियांवर उपचार करणारे डॉ. आर. एम. अग्रवाल यांनी सांगितले, की तोगडिया यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची साखर कमी झाली होती आणि त्यामुळेच ते बेशुद्ध झाले होते. तोगडिया यांना एक रुग्णवाहिका रुग्णालयात घेऊन आली होती. आता त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली आहे.

तत्पूर्वी, प्रवीण तोगडिया पोलिसांच्या अटकेत असताना बेपत्ता झाल्याचा खळबळजनक आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. एका जुन्या प्रकरणात राजस्थान पोलिसांचे पथक तोगडिया यांना अटक करायला सोमवारी अहमदाबादमध्ये आले होते. मात्र, त्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेने प्रवीण तोगडिया बेपत्ता असल्याचे सांगितले. तसेच आम्ही सध्या त्यांचा शोध घेत असल्याचेही पोलिसांनी म्हटले होते.

प्रवीण तोगडिया यांच्यावर सार्वजनिक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांचे पथक तोगडिया यांच्या निवासस्थानी त्यांना अटक करायला गेले होते. मात्र, आम्ही घरी गेलो तेव्हा तोगडिया तिथे नव्हतेच, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, ही बातमी ऐकल्यानंतर विहिंपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले, असा आरोप करत विहिंपच्या कार्यकर्त्यांनी सोला पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. तसेच सरखेज-गांधीनगर द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी लवकरात लवकर तोगडियांना शोधावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

Web Title: ahmadabad news Praveen Togadia found unconscious