भाजप पुन्हा रामाच्या आश्रयाला

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

  • अयोध्येचे रामायण गुजरातच्या रणभूमीवर
  • प्रचार सभेत मोदींचा सिब्बलांवर वार, कॉंग्रेसचेही प्रत्युत्तर

  • अयोध्येचे रामायण गुजरातच्या रणभूमीवर
  • प्रचार सभेत मोदींचा सिब्बलांवर वार, कॉंग्रेसचेही प्रत्युत्तर

अहमदाबाद: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातील वाक्‌युद्ध अधिक तीव्र झाले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राम मंदिराच्या मुद्याला हात घालत कॉंग्रेसवर निशाणा साधला. कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केल्याचा संदर्भ घेत मोदींनी कॉंग्रेस नेते हा मुद्दा 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीशी का जोडत आहेत? असा सवाल केला. मोदींच्या या प्रश्‍नानंतर आक्रमक झालेल्या भाजप प्रवक्‍त्यांनीही शाब्दिक वार केल्याने कॉंग्रेसनेही राममंदिरासाठी तुम्ही काय केले? असा सवाल केला आहे.

अयोध्येतील बाबरी मशीद पतनाला आज 25 वर्षे पूर्ण झाली असताना ही वादाची "रामकथा' मात्र काही केल्या थांबायला तयार नाही. विरोधकांच्या आक्रमक हल्ल्यांमुळे प्रचारात बॅकफूटवर गेलेल्या भाजपने पुन्हा एकदा श्रीरामाचा आश्रय घेतला आहे. धांधूक येथील सभेत मोदी म्हणाले की, ""राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीशी जोडणे कितपत योग्य आहे? निवडणुकीतील लाभासाठी महत्त्वाच्या विषयांवर निर्णयच न घेणारा कॉंग्रेस पक्ष सिब्बल यांचे मत वैयक्तिक का ठरवू पाहत आहे? सिब्बल यांनी न्यायालयामध्ये खुशाल मुस्लिमांच्या हिताच्या गोष्टी कराव्यात. बाबरी मशिदीवर युक्तिवाद करावा, याला आमचा आक्षेप नाही; पण तेच सिब्बल अयोध्या प्रकरणाला 2019 मधील लोकसभा निवडणुकीशी कसे काय जोडू शकतात?

सुन्नी वक्‍फ बोर्ड नाराज
रामजन्मभूमी बाबरी मशीद वादामध्ये सुन्नी वक्‍फ बोर्डाची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी या खटल्याची सुनावणी 2019 मधील लोकसभा निवडणूक होईपर्यंत पुढे ढकलावी, असे मत मांडले होते. न्यायालयानेही सिब्बल यांची ही मागणी फेटाळून लावल्यानंतर आता सुन्नी वक्‍फ बोर्डानेही सिब्बल यांच्या वक्तव्यापासून दोन हात दूरच राहणे पसंत करत यावर नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाच्या या भूमिकेचेही पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले असून, कॉंग्रेस वगळता सर्वांनाच या समस्येवर वेळेत तोडगा निघावा असे वाटते, असे मोदी यांनी नमूद केले.

राममंदिराबाबत न्यायालयामध्ये लवकर सुनावणी व्हावी, म्हणून भाजपने काहीही केलेले नाही.
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते कॉंग्रेस

"सुन्नी वक्‍फ बोर्डा'चे म्हणणे लक्षात घेता कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसचे नेते या नात्यानेच "ते' वक्तव्य केले होते हे स्पष्ट होते
- अमित शहा, अध्यक्ष भाजप

अयोध्येत राममंदिराच्या उभारणीस विरोध करणाऱ्या राहुल गांधींनी ओवेसी आणि जिलानींसोबत हातमिळवणी केली आहे. राहुल हे बाबराचे भक्त आणि खिलजीचे नातेवाईक आहेत. बाबराने राममंदिर पाडले, खिलजीने सोमनाथची लूट केली होती. नेहरू घराणे हे दोन्ही मुस्लिम आक्रमकांच्या बाजूने आहे.
- जी. व्ही. एल. नरसिंहराव, भाजपचे प्रवक्ते

बदलते हुए मौसम का परवाना हूं मै, गुजरात में जनेऊधारी हिंदू हूं तो यूपी-बिहार में मौलाना हूं मै!
- संबीत पात्रा, प्रवक्ते भाजप

मोदी-योगींच्या राज्यामध्ये राममंदिर उभे राहिले नाही, तर भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागेल.
- महंत नृत्यगोपालदास

Web Title: ahmedabad news bjp and ram mandir ayodhya