काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात

महेश शहा
शुक्रवार, 28 जुलै 2017

अहमदाबाद: बिहारमध्ये आघाडी सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद बलवंतसिंह राजपूत, आमदार तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

बलवंतसिंह राजपूत हे शंकरसिंह वाघेलांचे व्याही असून त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. वाघेलांच्या जाळ्यात काँग्रेस अडकत चालली असून, त्यात राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो. गुजरात काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली असून, अंतर्गत कलाहामुळे तीन आमदारांनी पक्ष सोडल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि गुजरात सरकार विकासकामांवर भर देत असल्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसचे पाटीदार समाजाबाबतचे धोरण अमान्य असल्याने आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे सांगितले.

शंकरसिंह वाघेलांनंतर तीन आमदारांचे राजीनामे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी बारा ते पंधरा आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. येत्या आठ ऑगस्टला गुजरातला दोन राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या तीन आमदारांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याने गुजरात काँग्रेसला हादरा बसला आहे. काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 57 वरून 54 वर आले आहे. काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना विजयी करण्यासाठी 47 आमदारांचे पाठबळ असणे गरजेचे आहे.

Web Title: ahmedabad news congress mla and bjp gujrat