गुजरातेत भाजपच्या सत्तामार्गात "जात' आडवी

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान

नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट' वेगाने धावणाऱ्या भाजपला विधानसभेच्या आगामी निवडणुकीत विजय मिळविणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. तब्बल दशकभर हिंदुत्वाभोवती घुटमळलेल्या राज्याच्या राजकारणाने आता जातीय रंग दाखवायला सुरवात केली आहे. तीन उच्चवर्णीय आणि एका आदिवासी नेत्याने सत्ताधारी भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण केले असून, अन्य पक्ष हे जातीय नेतृत्व आपल्या दावणीला कसे बांधता येईल या विचारात आहे.

तीन घटकांचा प्रभाव
गुजरातमध्ये नव्वदच्या दशकापासून सत्तेच्या परिघात वावरणाऱ्या भाजपला आता प्रथमच किचकट जातीय समीकरणे सोडवावी लागणार आहेत. राज्यामध्ये 2002 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीनंतर जात हा घटक काहीसा मागे पडला होता. त्या वेळी दलित आणि आदिवासींनीही भाजपला मतदान केले होते; पण आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तीन जातीय घटक महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. यातील पहिला घटक हा आंबेडकरी जनता दुसरा पटेल समर्थक आणि तिसरा क्षत्रीय हा आहे.

आव्हान सोपे नाही
भाजपच्या 19 वर्षांच्या सत्ताकाळात नरेंद्र मोदी हे आक्‍टोबर 2001 ते मे 2014 पर्यंत म्हणजे तब्बल 13 वर्षे मुख्यमंत्री होते. 2002, 2007 आणि 2012 अशा सलग तीन वेळा भाजपने आपला विजय ध्वज येथे फडकावला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व 24 जागा जिंकत विरोधकांना भुईसपाट केले होते; पण विधानसभेची आगामी निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. आनंदीबेन यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले विजय रूपानी हे प्रभावहीन नेते आहेत.

ठाकूर, पटेल प्रभावी घटक
अल्पेश ठाकूर (क्षत्रिय ठाकूर नेते) आणि हार्दिक पटेल (पाटीदार नेते) हे दोन घटक आगामी निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. येत्या काळामध्ये कोणा एका व्यक्तीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणे शक्‍य होणार नाही, असे संयुक्त जनता दलाच्या बंडखोर गटाचे नेते छोटूभाई वसावा यांनी सांगितले. पटेल आंदोलनाची ताकद दिसून आल्यानंतर भाजपप्रमाणेच कॉंग्रेसनेही या समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसने उच्चवर्णींयामधील आर्थिक मागासांना 20 टक्के आरक्षण देण्याचे आश्‍वास दिले होते.

भाजप, कॉंग्रेसच्या वाटाघाटी
पंतप्रधान मोदी यांनी ज्या गुजराती विकासाच्या मॉडेलचे भांडवल केले, तेच भांडवल आता भाजपला पुरणारे नाही, हे संघ परिवारानेही मान्य केले आहे. शरद यादवप्रणीत जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष छोटूभाई वसावा हे आदिवासींचा चेहरा म्हणून पुढे आले आहेत. तब्बल सहावेळेस विधानसभेवर निवडून येणारे वसावा हे यादव यांचे निष्ठावंत आहे. दलित विकास आंदोलनाचे नेते जिग्नेश मेवानीस आपल्या गोटात ओढण्यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत, तर 120 मतदारसंघांमध्ये प्रभाव असलेल्या "गुजरात क्षत्रिय ठाकूर सेने'च्या अल्पेश ठाकूर सोबत भाजपच्या वाटाघाटी सुरू आहेत.

Web Title: ahmedabad news In Gujarat, the caste horizontal way of BJP's power