गुजरातमध्ये ऑक्‍सिजन अभावी दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ऑक्‍सिजनअभावी 60 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अहमदाबादमध्येही ऑक्‍सिजन न मिळाल्याने 19 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. ऑक्‍सिजनअभावी मृत्यू झालेली ही गुजरातमधील पहिली घटना आहे.

अहमदाबाद: उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ऑक्‍सिजनअभावी 60 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अहमदाबादमध्येही ऑक्‍सिजन न मिळाल्याने 19 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. ऑक्‍सिजनअभावी मृत्यू झालेली ही गुजरातमधील पहिली घटना आहे.

सानंदमधील नवापुरा गावातील दर्शन नावाच्या बालकास स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्याला सोला सिव्हिल रुग्णालयातून सिटी सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात येत होते. त्या वेळी त्याला श्‍वास घेताना अडथळा येत होता; पण रुग्णवाहिकेतील ऑक्‍सिजनचे दोन्ही सिलिंडर रिकामे होते. वेळेत ऑक्‍सिजन न मिळाल्याने दर्शनचा मृत्यू झाला. या रुग्णवाहिकेची जबाबदारी असलेल्या दोन डॉक्‍टरांवर पोलिसांनी तक्रार नोंदविली आहे. त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असून आतापर्यंत 230 बळी गेले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी अहमदाबाद, सुरत, राजकोट, बडोदा येथील प्रमुख सरकारी रुग्णालयांना नुकतीच भेट दिली. गंभीर व गुंतागुंतीच्या प्रसंगी रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला केल्या असून प्रत्येक स्वाईन फ्लूच्या रुग्णांना "टॅमी फ्लू' गोळ्या उपलब्ध करण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला स्वाईन फ्लू
मुख्यमंत्री रुपानी यांच्या भगिनी चारू शाह यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गांधीनगरमधील सरकारी रुग्णालयातून गुरुवारी (ता.17) त्यांना थालतेज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्‍यक सर्व उपचार सुरू असल्याचे सांगितले आले.

Web Title: ahmedabad news gujarat child dies due to oxygen