गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे

महेश शहा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

काँग्रेस, भाजपकडून प्रचार समित्यांची स्थापना

काँग्रेस, भाजपकडून प्रचार समित्यांची स्थापना

अहमदाबाद : गुजरातमध्ये आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रचार समित्यांची स्थापना केली आहे. भाजपने संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपविली आहे.
जेटली यांच्या मदतीस केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी याही असतील, त्या भाजपच्या स्टार कॅंपेनर म्हणून काम पाहणार आहेत. गांधीनगरमधील भाजपच्या मुख्यालयामध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू असून, काँग्रेसनेही आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. गुजरातमध्ये खुद्द काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष घातले असून, त्यांनी नुकतीच पक्षाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली होती. गुजरात काँग्रेसमध्ये आता दहा नवे प्रदेशाध्यक्ष, 14 सरचिटणीस, 7 प्रवक्‍ते आणि 63 सचिवांचा समावेश असेल, यामध्ये अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश केल्यास ही संख्या 172 वर पोचेल.

काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ पटेल यांना विधानसभा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष करण्यात आले असून, माजी अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांच्याकडे निवडणूक प्रचार साहित्य विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रवक्ते शक्तिसिंह गोहील यांच्याकडे निवडणूक माध्यम समितीच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. निवडणूक जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी राज्यसभा सदस्य मधुसूदन मिस्त्री यांची निवड करण्यात आली आहे. बडोद्यातील राजघराण्याशी संबंध असणारे सत्यजित गायकवाड आणि ठाकूर समाजाचे नेते जगदीश ठाकूर यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते शंकरसिंह वाघेला यांच्या समर्थकांना संघटनेतून डच्चू देण्यात आला असून, वाघेला यांचे निष्ठावंत किशोरसिंह सोळंकी, रेखा चौधरी आणि अन्य नेत्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नाही.

Web Title: ahmedabad news gujrat election