अहमदाबादमध्ये वर्गशिक्षकांकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

महेश शहा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, याबाबत पीडितेने घरी गेल्यानंतर तिच्या आईला घटनेबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आजोबांनी तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर आरोपीला तासाभरातच अटक करण्यात आली. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
- उषा राडा, पोलिस उपआयुक्त, मंडळ-2, अहमदाबाद

अहमदाबाद: अहमदाबाद येथील पालिकेच्या शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीवर वर्गशिक्षकानेच वर्गातच बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी सुनील डमोर (वय 30) या शिक्षकास साहपूर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पालिकेच्या शाळेत तणावाचे वातावरण आहे.

साहपूर येथील पालिकेच्या शाळा नंबर 5 व 6 मध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याचे चित्र आहे. तसेच शाळेमध्ये कोणत्याही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. मुलींची स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नसून, सांडपाण्याची पाईपही तुंबलेली आहे. एकूणच पालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळत असल्याचे चित्र आहे. दरवाजे नसलेली स्वच्छतागृहे वापरण्याशिवाय विद्यार्थिनींकडे पर्याय नसल्याची माहिती शाळेच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, संतप्त पालकांनी सोमवारी शाळेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत दगडफेकही केली. स्थानिक नेत्यांनीही शाळेसमोर एकत्र येत घडलेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. पीडित विद्यार्थिनीच्या आजोबांनी शिक्षकाच्या क्रूरतेबद्दल कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच न्यायासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देणार असल्याचे सांगितले.

शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत
अहमदाबाद पालिकेच्या एकाही शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्याची कबुली अहमदाबाद पालिका शाळा मंडळाचे अध्यक्ष पंकज चौहान यांनी दिली. त्यामुळे पालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजी असल्याचेच चित्र निदर्शनास येत आहे. पालिकेच्या निष्काळजीपणाबद्दल पालकांनीही संताप व्यक्त केला आहे.

Web Title: ahmedabad news teacher rape student in gujrat