शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी कार्यकर्त्यांची इच्छा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पक्षाला मिळालेला पाठिंबा आणि विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारावे. शशिकला या मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात. शशिकला यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही तंबीदुराई यांनी म्हटले आहे.

चेन्नई - अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनास महिना होण्याच्या आतच अण्णा द्रमुक पक्षात राजकीय कलह निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लोकसभेचे उपसभापती एम.तंबीदुराई यांनी पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांना तमिळनाडूची सूत्रे स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोज गार्डन येथील निवासस्थानी तंबीदुराई यांनी शशिकला यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपद तातडीने स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, दोन वर्षांनंतर देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाला मिळालेला पाठिंबा आणि विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारावे. शशिकला या मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात. शशिकला यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही तंबीदुराई यांनी म्हटले आहे. यापूर्वी महसूलमंत्री उदय कुमार आणि पक्ष प्रवक्ते पोन्नियन यांनीही शशिकला यांना मुख्यमंत्री होण्याची विनंती केली होती. अण्णा द्रमुकचे प्रमुख नेते शशिकला मुख्यमंत्री होण्यासाठी वातावरणनिर्मिती करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यात पद सोडण्याची मानसिकता निर्माण केली जात आहे.

शशिकलांवर वाढती जबाबदारी

जयललिता यांच्या निधनानंतर काही दिवसांतच शशिकला यांच्यावर पक्षाची धुरा पडली. कारण, त्यांच्याशिवाय अन्य कोणताही पर्याय समोर नव्हता. जयललिता यांनी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्रिपद सोडले, तेव्हा पनीरसेल्वम यांनाच मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, वैयक्तिक जीवनात शशिकला या 1980 च्या दशकापासून जयललिता यांच्यासमवेत राहिलेल्या आहेत. आजारपण ते अंत्यसंस्कार या घटनांत शशिकला या त्यांच्यासमवेत राहिल्या आहेत. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांचा ओढा शशिकलांकडे राहिला आहे. शशिकला यांच्यावर जयललिता यांना विष देण्याचा आरोप करण्यात आला होता. एकदा तर दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या घरातून त्यांना बाहेर काढले होते. मात्र तीन महिन्यांतच हा वाद निवळला.
 

Web Title: aiadmk to witness political conflict?