भाजप नेत्यांनी आधी संविधानाचा अभ्यास करावा; 'लव्ह जिहाद'वरुन ओवैसी आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 22 November 2020

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे

हैदराबाद- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कथित लव्ह जिहाद विरोधात कायदा आणू पाहणाऱ्या राज्यांना आधी संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. असा कोणताही कायदा संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन असेल, असं ओवैसी म्हणाले आहेत. भाजपवर धार्मिक कट्टरतावाद पसरवण्याचा आरोप करत ओवैसी म्हणाले की ते ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडणुकींना धार्मिक रंग देऊ पाहात आहेत. 

Nagrota Encounter: कमांडो ट्रेनिंग घेतलेल्या दहशतवाद्यांनी 30 KM चालत केला होता...

लव्ह जिहादच्या नावाखाली आणला जाणारा कायदा अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन असेल. जर असे करायचं असेल तर आधी स्पेशल मॅरेज कायद्याला संपवावे लागेल. द्वेषाचा हा दुष्प्रचार चालणार नाही. भाजप बेरोजगार युवकांना भटकवण्याचा प्रयत्न करत आहे. हैदराबादमध्ये पूर आला होता तेव्हा मोदी सरकारने काय मदत केली? मोदी सरकार जीएचएमसी निवडणुकीला धार्मिक रंग देऊ पाहात आहे. पण, भाजपचा हा डाव यशस्वी ठरणार नाही, कारण लोक सत्य जाणतात, असं ओवैसी म्हणाले आहेत.  

भाजप नेते झोपेतसुद्धा माझं नाव घेतील

ओवैसी म्हणाले की, ''जर तुम्ही भाजप नेत्यांना रात्री जागे करुन काहीही विचाराल तर ते ओवैसी, गद्दार, दहशतवाद आणि शेवटी पाकिस्तानचं नाव घेतील. भाजपने सांगावे की त्यांनी तेलंगना विशेष करुन हैदराबादला 2019 साली कोणती आर्थिक मदत केली आहे.'' 

दरम्यान, लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. केंद्र सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, भाजप शासित राज्यांमध्ये याची सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्ये या विरोधात कायदा आणण्याचा मसुदा तयार करत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे सरकार असलेले राज्ये अशा कायद्यांना विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे.  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. भाजप नेत्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी आंतरधर्मीय विवाह केले आहेत. मी भाजप नेत्यांना विचारतो की, हे सर्व विवाह आता लव्ह जिहादच्या व्याख्येत येणार आहेत का?, असा सवाल त्यांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aimim asasuddin owaisi criticize bjp on love jihad issue