हवाई दलाचे विमान अद्यापही बेपत्ता

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जून 2019

भारतीय हवाई दलाचे एएन-32 हे वाहतूक विमान उड्डाणानंतर बेपत्ता झाले आहे. आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केलेल्या या विमानात आठ कर्मचारी आणि पाच प्रवासी होते.

इटानगर : भारतीय हवाई दलाचे काल (ता. 3) बेपत्ता झालेल्या एएन-32 या वाहतूक विमानाचा अद्यापही ठावठिकाणा सापडलेला नाही. हवाई दलातर्फे सुरू असलेल्या शोधमोहिमेत आज (मंगळवार) नौदलानेही सहभाग घेत त्यांचे दीर्घ पल्ल्याचे पी 8 आय हे विमान शोधासाठी पाठविले आहे.

सोमवारी (ता. 3) आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केलेले हवाई दलाचे विमान 33 मिनिटांनंतर बेपत्ता झाले. नौदलाचे पी 8 आय विमान इलेक्‍ट्रो ऑप्टिकल आणि इन्फ्रा सेन्सर्सच्या मदतीने पर्वतीय भागात आणि चीनजवळील मेंचुका येथे विमानाचा शोध घेणार आहे.

दरम्यान, भारतीय हवाई दलाचे एएन-32 हे वाहतूक विमान उड्डाणानंतर बेपत्ता झाले आहे. आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केलेल्या या विमानात आठ कर्मचारी आणि पाच प्रवासी होते. रशियन बनावटीच्या एएन-32 या विमानाने विमानतळावरून दुपारी 12.25 वाजता उड्डाण केल्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. हे विमान अरुणाचल प्रदेशातील शियोमी जिल्ह्यातील मेनचुका येथे जात होते. मेनचुका चीनच्या सीमेजवळ आहे. या विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाची विमाने परिसरात घिरट्या घालत असून, सर्व उपलब्ध साधनांचा वापर करून शोध घेतला जात आहे. विमान कोसळण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणांवर हेलिकॉप्टरमधूनही शोध घेतला जात असून, विमानाचे अवशेष सापडले नसल्याचे हवाई दलाने सांगितले. शोध मोहिमेमध्ये हवाई दलासह, लष्कर, सरकारी तपास संस्था आणि स्थानिक पोलिस सहभागी झाले आहेत. हवाई दलाची सी-130 आणि दुसरे एएन-32 विमाने आणि दोन एमआय-17 हेलिकॉप्टर विमाने, तर लष्कराचीही हेलिकॉप्टरर्स शोध घेत आहेत. या शोधमोहिमेवर संरक्षण मंत्री राजनाथसिंह हेदेखील लक्ष ठेवून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air Force An 32 aircraft missing for Day 2 and Isro deploys satellites for search ops