'एअर इंडिया'कडून रवींद्र गायकवाडांचे तिकिट पुन्हा रद्द

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

"एअर इंडिया'ने विमानातील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांचे विमान प्रवासाचे तिकिट पुन्हा एकदा रद्द केले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गायकवाड यांना बुधवारी मुंबईहून दिल्लीला जायचे आहे. त्यासाठीचे त्यांचे तिकिट रद्द करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - "एअर इंडिया'ने विमानातील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांचे विमान प्रवासाचे तिकिट पुन्हा एकदा रद्द केले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गायकवाड यांना बुधवारी मुंबईहून दिल्लीला जायचे आहे. त्यासाठीचे त्यांचे तिकिट रद्द करण्यात आले आहे.

मागील आठवड्यात गायकवाड एअर इंडियाच्या विमानाने पुण्यावरून दिल्लीला जात होते. दरम्यान विमानात बिझनेस क्‍लास नव्हता. यावरून त्यांचा विमानातील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. त्यातून गायकवाड यांनी संबंधित कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण केली. त्यानंतर आपल्या कृत्याचे समर्थन करत माफी मागण्यासही गायकवाड यांनी नकार दिला. त्यामुळे एअर इंडियासह अन्य काही विमान कंपन्यांनी त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी सकाळी आठ वाजता "एआय 806' या विमानाने गायकवाड यांना मुंबईहून दिल्लीला प्रवास करायचा आहे. त्यासाठी त्यांनी "एअर इंडिया'च्या मदत कक्षाला दूरध्वनी केला. "आम्हाला कडक सूचना आहेत की सन्माननीय खासदारांना आमच्या कोणत्याही विमानातून प्रवास करू दिला जाऊ नये. त्यांच्याकडे तिकिट जरी असले तरीही ते प्रवास करू शकणार नाहीत', असे उत्तर त्यांना मिळाले. इतर कंपन्याही गायकवाड यांच्या विमान प्रवासावर लक्ष ठेवून असून ' 'रवींद्र गायकवाड' नावाने तिकिट बुक करणाऱ्यांकडे लक्ष दिले जात आहे. गायकवाड यांना ज्या मार्गावर प्रवास करायचा आहे, तेथे विशेष लक्ष दिले जात आहे', अशी माहिती एका खाजगी विमान कंपनीतील अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे.

Web Title: Air India Cancels Another Ticket For Shiv Sena MP Ravindra Gaikwad