विमान अपघातग्रस्तांची माणुसकीची ‘भरारी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

air

विमान अपघातग्रस्तांची माणुसकीची ‘भरारी’

कोझिकोड : केरळमधील करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वर्षांपूर्वी ‘एअर इंडिया एक्सप्रेस’च्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी झाले होते. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले होते. या स्थानिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे कुटुंबीय व बचावलेल्या प्रवाशांनी स्थानिकांसाठी रुग्णालय उभारण्याकरिता ५० लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. या सर्वांनी नुकसानभरपाईच्या रक्कमेतून हा निधी उभारला आहे.

कोरोना साथीदरम्यान परदेशातील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ‘वंदे भारत’ मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतंर्गत दुबईहून भारतीय प्रवाशांना घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेस विमान मुसळधार पावसामुळे सात ऑगस्ट २०२० रोजी धावपट्टीवरून घसरून ३५ फूट दरीत पडले होते. विमानाचा अपघात झालेल्या ठिकाणाजवळ केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र होते. सर्वांत जवळचे रुग्णालय आठ किलोमीटरवर होते.

अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत रात्रभर मदत व बचावकार्य राबविले होते. स्थानिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे कुटुंबीय व वाचलेल्या प्रवाशांनी स्थानिकांसाठी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरच नवीन रुग्णालयाची इमारत उभारली जाईल. या अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रवाशांचे नातेवाईक व जखमींना विमा कंपन्यांकडूनही नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे. जखमेच्या तीव्रतेनुसार काहीजणांना सात लाख तर काहीजणांना एक कोटी रुपये मिळाले असून गंभीर जखमींना पाच कोटींची रक्कम मिळाली आहे.

अपघातस्थळापासून सर्वांत जवळचे रुग्णालय आठ किलोमीटरवर होते. प्राथमिक आरोग्य केंद्र ३०० मीटरवर असले तरी तेथे सुविधांचा अभाव होता. त्यामुळे सर्वप्रथम धाव घेऊन अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या स्थानिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य खात्याच्या मंजुरीनंतर रुग्णालयाचे बांधकाम सुरू होईल.

- अब्दुरहिमान एडक्कुनी, संचालक, मलबार विकास परिषद

टॅग्स :delhiAir IndiaAir Force