एअर इंडियाला मिळेना बाकी; सरकारकडे 451 कोटी रुपयांची देणी

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

नवी दिल्ली : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यापोटी 451 कोटी रुपये केंद्र सरकारकडून एअर इंडियाला येणे बाकी आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बत्रा यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळविली आहे. 

नवी दिल्ली : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यापोटी 451 कोटी रुपये केंद्र सरकारकडून एअर इंडियाला येणे बाकी आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बत्रा यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळविली आहे. 

सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची देणी मिळावीत, यासाठी नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी विविध मंत्रालयांना तब्बल 31 पत्रे लिहिली आहेत. एअर इंडियाने 'बोइंग 747-400' ही तीन विमाने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी राखीव ठेवली आहेत. तसेच आपत्कालीन काळात मदतकार्यासाठी आणि विदेशी राजकीय पाहुण्यांसाठी एअर इंडिया विशेष सेवा देते. 

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यापोटी मार्चअखेरीस केंद्र सरकारकडे एअर इंडियाचे 451.75 कोटी रुपये येणे बाकी आहे. ही बाकी 2006 पासूनची आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका, आफ्रिकेतील देश, उझबेकिस्तान, व्हिएतनाम आणि थायलंड या 9 नोव्हेंबर 2016 ते 10 फेब्रुवारी 2017 या कालावधीत सहा दौऱ्यांचे 43.37 कोटी रुपये बाकी आहेत. उपराष्ट्रपतींनी जून 2008 ते मार्च 2017 या कालावधीत केलेल्या 22 दौऱ्यांचे 206.19 कोटी रुपये अद्याप एअर इंडियाला मिळायचे आहेत. 

फायदा की तोटा? 
एअर इंडियाला आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 105 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. महालेखापालांनी हा दावा खोडून काढला होता. या आर्थिक वर्षात एअर इंडियाला 321 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे महालेखापालांनी स्पष्ट केले होते.

मदतकार्याचेही पैसे नाहीत 
इराक, माल्टा, कैरो येथील युद्ध क्षेत्रातून भारतीयांची सुटका करणे, कॅटरिना चक्रीवादळानंतर अमेरिकेला मदत पाठविणे याचे पैसे एअर इंडियाला मिळालेले नाहीत. तसेच विदेशी पाहुण्यांसाठीच्या 27 उड्डाणांचे 23.57 कोटी रुपये परराष्ट्र मंत्रालयाकडे बाकी आहेत.

Web Title: Air India still waiting to get its dues from Government