अजमेर स्फोटांचा निकाल लांबणीवर

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

आतापर्यंत या खटल्याशी संबंधित 149 साक्षीदारांची पडताळणी करण्यात आली असून, 451 दस्तावेजांचाही अभ्यास करण्यात आला आहे

जयपूर - येथे अजमेर दर्ग्यात 2007 मध्ये झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणाची सुनावणी आज विशेष न्यायालयाने 8 मार्चपर्यंत पुढे ढकलल्याने या खटल्याचा निकालही लांबला आहे. बचाव आणि सरकारी पक्षाने सादर केलेल्या विविध पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याने न्यायदंडाधिकारी दिनेश गुप्ता यांनी या खटल्याच्या सुनावणीस स्थगिती दिली.

अजमेर येथील प्रसिद्ध ख्वाजा मोईनुद्दीन चिश्‍ती यांच्या दर्ग्याजवळ 11 आक्‍टोबर 2007 रोजी झालेल्या बॉंबस्फोटामध्ये तिघे जण ठार झाले होते, तर अन्य पंधरा नागरिक जखमी झाले होते. सुरवातीस या खटल्याच्या तपासाची सूत्रे राजस्थान "एटीएस'कडे होती, त्यानंतर तो खटला राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आला होता. आतापर्यंत या खटल्याशी संबंधित 149 साक्षीदारांची पडताळणी करण्यात आली असून, 451 दस्तावेजांचाही अभ्यास करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी स्वामी असिमानंद, भावेश पटेल, हर्षद सोळंकी, लोकेश शर्मा, देवेंद्र कुमार, मेहुलकुमार, मुकेश वासानी आणि भरत भाई हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून, याच प्रकरणातील अन्य एक आरोपी चंद्रशेखर सध्या जामिनावर बाहेर आहे. या सर्व आरोपींना आज न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते.

Web Title: ajmer blast case prolonged