नेताजींनाही सोबत घेऊ - अखिलेश यादव

पीटीआय
बुधवार, 18 जानेवारी 2017

पित्याला हरविण्याला आनंद नाही; मात्र ही लढाई आवश्‍यक होती, असे अखिलेश यांनी याविषयी बोलताना नमूद केले. दरम्यान, या विजयानंतर अखिलेश यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करत मोठा जल्लोष केला

लखनौ - पक्षाच्या चिन्हाची लढाई जिंकल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज पिता मुलायमसिंह व आपल्यात कोणता वाद नसल्याचे स्पष्ट करीत आपले नाते अतूट असल्याचे म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेऊ, असे प्रतिपादन ही त्यांनी केले.

कालिदास मार्गावरील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. अखिलेश म्हणाले, ""नेताजींसह सर्वांना बरोबर घेऊन राज्यात पुन्हा समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन करण्यास आपले प्राधान्य राहणार आहे. सायकलचे चिन्ह आपल्यालाच मिळणार अशी खात्री होती. आता निवडणुकीसाठी कमी कालावधी उरला असून, आपल्याला उमेदवारांची यादीही निश्‍चित करावयाची आहे. आपल्यावर ही सर्वांत मोठी जबाबदारी असून, त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत.''

गेले काही दिवस या पिता-पुत्रामध्ये सुरू असलेल्या कौंटुबिक कलहात पुत्राची सरशी झाली असून अखिलेश यांनी पक्षाच्या चिन्हावर केलेला दावा निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. पित्याला हरविण्याला आनंद नाही; मात्र ही लढाई आवश्‍यक होती, असे अखिलेश यांनी याविषयी बोलताना नमूद केले. दरम्यान, या विजयानंतर अखिलेश यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करत मोठा जल्लोष केला. त्या वेळी मुलायमसिंह यांनी आपल्या घरातच राहणे योग्य समजत शिवपाल यादव व अंबिका चौधरी यांची भेट घेतली.

सायकल चलती जाऐगी...
अखिलेश यादव यांनी सोमवारी रात्री उशिरा मुलायमसिंह यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी नेताजींसोबतची जुनी तीन छायाचित्रे ट्‌विटरवर टाकली असून, "सायकल चलती जाऐगी, आगे बढती जाऐगी' असे ट्‌विट केले आहे.

Web Title: akhilesh vows to cooperate with father