अखिलेश हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार- मुलायम

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

अखिलेश आणि माझ्यात कोणताही वाद उरलेला नाही. निवडणुकीनंतर जेव्हा आमच्या पक्षाची सत्ता येईल, तेव्हा अखिलेशच मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी नमूद केले.

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज सपशेल माघार घेत आगामी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हे अखिलेशच असतील, असे जाहीर केल्याने पक्षांतर्गत संघर्षाला सायंकाळी वेगळे वळण मिळाले.

अखिलेश आणि माझ्यात कोणताही वाद उरलेला नाही. निवडणुकीनंतर जेव्हा आमच्या पक्षाची सत्ता येईल, तेव्हा अखिलेशच मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, समाजवादी पक्षातील निवडणूक चिन्हाचा वाद दिल्लीत पोचला असून, "सायकल' हे चिन्ह नेमके कोणाला द्यायचे याबाबत निवडणूक आयोग लवकरच निर्णय घेऊ शकतो.

राज्याच्या हितासाठी आमचा पक्ष एकत्र राहील. पक्षात कोणतीही फूट नसून लवकरच आम्ही प्रचारमोहीम सुरू करू. मी लखनौमध्ये पोचताच सर्व वाद संपेल, असा विश्‍वास मुलायम यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी मुलायमसिंह यांनी पक्षातील या संघर्षास रामगोपाल यादव यांना जबाबदार ठरविले होते. रामगोपाल यांना पक्षातून काढण्यात आले असल्याने राज्यसभेतील आपल्या शेजारील त्यांची खुर्ची हलविण्यात यावी, अशी विनंती त्यांनी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे केली होती.

अखिलेशशी कोणताही वाद नाही : मुलायमसिंह 
गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षात कौटुंबिक सत्तासंघर्ष सुरू असताना पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी अखिलेश आणि माझ्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. 

आमच्या पक्षात वाद जरूर आहेत आणि या सगळ्यामागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचे सांगत मुलायमसिंह यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांच्यावर आरोप केला. मात्र, त्याच वेळी हे वाद नक्की मिटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी समाजवादी पक्षाच्या सायकल या अधिकृत चिन्हावरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. हा मुद्दा सध्या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. आता निवडणूक आयोगच हे चिन्ह कोणाला द्यायचे, हे ठरवेल असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, रामगोपाल यांनी मुलायमसिंह यांच्या वक्तव्यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, उमेदवारी जाहीर करण्याची वेळ येऊन ठेपल्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर पक्षाच्या चिन्हासंदर्भात निकाल द्यावा, असे रामगोपाल यादव यांनी सांगितले. कालच मुलायमसिंह यादव यांनी आपणच समाजवादी पक्षाचे प्रमुख असल्याचे स्पष्ट केले होते. 

रामगोपाल यादव अडचणीत 
मुलायमसिंह यादव यांच्याकडून आज रामगोपाल यादव यांना समाजवादी पक्षातून काढून टाकल्याबाबतचे पत्र राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना देण्यात आले. पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून रामगोपाल यांना हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यसभा अध्यक्षांना हे पत्र मिळाले असून, त्याची पडताळणी केली जात असल्याचे ट्‌विट उपराष्ट्रपतींचे ओएसडी गुरदीप सिंह सप्पाल यांनी केले आहे.

Web Title: Akhilesh Will Be Chief Minister: Mulayam Singh