मोदींना रोखण्यासाठी मायावती-अखिलेश येतायत एकत्र! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्तारुढ भाजपच्या विरोधात राजकीय आघाडी करण्याच्या दिशेने आता उत्तर प्रदेशमधील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये निर्णायक घडामोडी घडू लागल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपने विरोधकांना पुरते नामोहरम केल्यानंतर आता आगामी निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येत आहेत. यासंदर्भातील अधिकृत घोषणा उद्या (शनिवार) होण्याची दाट शक्‍यता आहे. 

बसपच्या नेत्या मायावती आणि सपचे नेते अखिलेश यादव यांच्यात गेल्या महिन्यात दिल्लीत जागावाटपाची चर्चा झाली होती. 2014 मधील भाजपच्या दणक्‍यानंतर या दोन्ही पक्षांनी आता निवडणुकीपूर्वीच सावधगिरी बाळगत आघाडीची घोषणा करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मायवती यांनी अखिलेश यादव यांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या तीनही मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. 'ही एका नव्या आघाडीची नांदी आहे', अशी प्रतिक्रिया अखिलेश यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. 

जागावाटपाच्या चर्चेनंतर आता बसप आणि सप या दोन्ही पक्षांच्या सचिवांनी एक संयुक्त पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शनिवारी पत्रकार परिषद होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मायावती आणि अखिलेश यादव हे दोघेही या पत्रकार परिषदेस उपस्थित असतील. 

जागावाटपाच्या चर्चेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्ष प्रत्येकी 37 जागांवर निवडणूक लढवितील. उर्वरित सहा जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील. या मित्रपक्षांमध्ये या दोन्ही पक्षांनी कॉंग्रेसचाही समावेश केला आहे. 

गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी भाजप आणि मित्रपक्ष अपना दलने मिळून 73 जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला पाच, तर कॉंग्रेसला दोन जागी विजय मिळाला होता. 

Web Title: Akhilesh Yadav and Mayawati to announce alliance ahead of Lok Sabha 2019 elections