शक्तिप्रदर्शनासाठी अखिलेश रथावर

यूएनआय
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

अखिलेश यांच्या करिष्म्याच्या बळावरच समाजवादी पक्ष पुन्हा सत्तेवर येऊ शकतो; पण काही लोकांना हे सत्य मान्य नाही. केवळ अखिलेश हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य चेहरा आहेत.
- किरणमय नंदा, समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष

लखनौ : समाजवादी पक्षातील अंतर्गत लढाईमध्ये काका शिवपाल यांनी "अमर' लॉबीच्या साहाय्याने केलेल्या कारस्थानांमुळे घायाळ झालेले मुख्यमंत्री अखिलेश यादव आता रथयात्रेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

अखिलेश यांच्या बहुचर्चित रथयात्रेला 3 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून, यासाठीची तयारीही पूर्ण झाल्याची माहिती पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने माध्यमांशी बोलताना दिली. विधानसभेच्या आगामी निवडणुकीचा प्रचार आणि पक्षांतर्गत विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी अखिलेश यांनी रथयात्रेचे हत्यार उपसले आहे. या रथयात्रेमध्ये समाजवादी पक्षातील रथीमहारथी नेते सहभागी होणार आहेत.

अखिलेश यांनी आज त्यांच्या निवासस्थानी समर्थक मंत्री, आमदार आणि शिवपाल यादव यांनी पक्षातून हकालपट्टी केलेल्या नेत्यांची बैठक घेतली. याच बैठकीमध्ये रथयात्रेचा आराखडाही निश्‍चित करण्यात आला. समाजवादी पक्षाची रथयात्रा भव्यदिव्य असायला हवी, त्यासाठी कामाला लागण्याचे निर्देश अखिलेश यांनी नेत्यांना दिले आहेत.

मुलायम यांच्या हस्ते प्रारंभ
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानासमोर असणाऱ्या मैदानातून या रथयात्रेस प्रारंभ होणार असून, पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव तिला हिरवा झेंडा दाखवतील. ही यात्रा उन्नावमार्गे कानपूरला जाणार असून, यासाठी शहीदपथ मार्गाचा अवलंब करण्यात येईल. या विकास रथयात्रेमध्ये "काम बोलता है' हा विशेष लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. या पन्नास मिनिटांच्या लघुपटामध्ये अखिलेश यांनी केलेली विकासकामे ठळकपणे मांडण्यात आली आहेत.

लोकांशी थेट संपर्क
या रथयात्रेच्या माध्यमातून अखिलेश हे थेट लोकांशी संपर्क साधणार आहेत. अखिलेश समर्थक मंत्री आणि आमदारांवर रथयात्रेसाठी गर्दी गोळा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये पक्षाच्या नेत्यांना यश आल्यास पक्षांतर्गत संघर्षही लोक विसरतील असे काहींना वाटते. समाजवादी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी याआधीच अखिलेश यांच्या रथयात्रेस पाठिंबा दिला आहे. काहींनी यासाठी मोठी रसदही पुरविण्याचे आश्‍वासन दिले आहे.

उपाध्यक्ष अखिलेश यांच्या पाठीशी
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनीही अखिलेश यांना समर्थन दिले असून नरेश अग्रवाल, बेनीप्रसाद वर्मा, रेवती रमण सिंह यांनीही अखिलेश तंबूचा रस्ता पकडला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेले शिवपाल यादव आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये सामावून घेण्यास अखिलेश यांनी नकार दिला आहे. रामगोपाल यांची शिवपाल यांनी पक्षातून हकालपट्टी केल्याने अखिलेश संतापले आहेत.

कॉंग्रेस-रालोदसोबत आघाडी
समाजवादी पक्षाने निवडणूकपूर्व आघाडीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी बोलणी सुरू केली असून, पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी यासंबंधीचे सर्वाधिकार शिवपाल यादव यांना दिले आहेत. पक्षाचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष या आघाडीसाठी विशेष अनुकूल आहेत. समाजवादी पक्षाने नेहमीच जातीयवादी पक्षाविरोधात संघर्ष केला असून, ही लढाई आम्ही कायम ठेवणार आहोत, असे शिवपाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासाठी शिवपाल यांनी मुलायम यांना विश्‍वासात घेतले आहे.

Web Title: Akhilesh Yadav to appear in Road Show