ModiWithAkshay …म्हणून मोदी उलटं घड्याळ घालतात

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

नरेंद्र मोदींनी अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारताना आवडी-निवडीबद्दल सांगितले. शिवाय, आपण उलटे घड्याळ का घालतो या सवयीबद्दलचे एक गुपित सांगितले.

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान मोदींच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. मोदींनी अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारताना आवडी-निवडीबद्दल सांगितले. शिवाय, आपण उलटे घड्याळ का घालतो या सवयीबद्दलचे एक गुपित सांगितले.

अक्षय कुमारने मुलाखतीदरम्यान मोदींना विविध प्रश्न विचारले. मोदींनीही प्रश्नांची उत्तर मोकळेपणाने दिली. अक्षय कुमारने उलटे घड्याळ घालण्याबाबत प्रश्न विचारताना म्हटले की, 'मी अनेकदा पाहिले आहे की, तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असे का?' या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, घड्याळ उलटं घालण्यामागचे एक विशेष कारण आहे. 'मी, अनेकदा मीटिंगमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर माझ्या या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. असे होऊ नये म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घालतो. कारण, वेळ पाहायची झाल्यास समोरच्या व्यक्तीसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहता येते.'

अक्षय कुमारने मोदींच्या खासगी जीवनाविषयकही काही प्रश्न विचारले, तुम्ही केवळ 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवी असते? त्यावर उत्तर देताना मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओमाबा यांचा संदर्भ देत, तेही मला हेच सांगतात, असे मोदींनी म्हटले. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण, ते माझे चांगले मित्र आहेत. आम्ही दोघेही एकेमकांना आरे-तुरे करतो. मागे एकदा ओबामा मला भेटले तेव्हाही ते म्हणाले, माझे ऐकले की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. पूर्ण झोप घेत जा... असे ओबामी म्हणाले. त्यावेळीही मी हसलो. आता, माझ्या शरीराला 3 ते 4 तास झोपेची सवय झाली आहे. मात्र, कमी झोप झाल्यामुळे कुठलाही त्रास किंवा ताण माझ्या शरीरावर पडत नाही, असे मोदींनी म्हटले.  

मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, 'लष्कराचा अधिकारी गणवेशात जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मीही सलाम करतो. एवढेच नव्हे 1962च्या युद्धावेळी देशासाठी प्राण देण्याचे ठरवले होते. गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे, असे वाचले होते. तेव्हा वडिलांना मी सांगितले की, मला सैन्यात भरती व्हायचे आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे?, अशी आठवणही मोदींनी सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दरवर्षी मला एक-दोन कुर्ते पाठवतात, असेही मोदींनी सांगितले. दरम्यान, अक्षय कुमारने दोन दिवसांपूर्वी एक ट्विट काहीतरी नवीन करतोय, असे म्हटले होते. अक्षय कुमारच्या ट्विटनंतर अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधल होते. मात्र, आज सकाळी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेऊन सर्वांनाचा आश्चर्याच धक्का दिला आहे.

Web Title: akshay kumars interview with pm narendra modi