सर्व 'एक्‍झिट पोल'वरून दिसते राहुल गांधींची 'एक्‍झिट'- भाजप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनंतर दिसून आला आहे. या मतदानोत्तर चाचण्यांमधून राहुल गांधी यांची "एक्‍झिट' दिसून येत असल्याची टीका भाजपने केली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनंतर दिसून आला आहे. या मतदानोत्तर चाचण्यांमधून राहुल गांधी यांची "एक्‍झिट' दिसून येत असल्याची टीका भाजपने केली आहे.

गुरुवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांमधून सर्वसाधारणपणे भाजपला बहुमत मिळेल असे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेत्या किरण खेर म्हणाल्या, "आतापर्यंत अनेक मतदानोत्तर चाचण्या झाल्या आहेत. मात्र आता राहुल गांधी यांना सांगा की या चाचण्यांमधून त्यांची "एक्‍झिट' होणार असल्याचे दिसत आहे.' तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री संजीव बल्याण म्हणाले, "गांधी यांना आणखी एक दिवस आनंदी राहतील. आम्ही आणखी एक दिवस त्यांना गैरसमजामध्ये राहण्याची संधी देतो. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.'

दरम्यान, विरोधकांनी या चाचण्या नाकारल्या आहेत. बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांवर सातत्याने दाखविण्यात येत असलेल्या या चाचण्यांसंदर्भातील वृत्तावर कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "वृत्तवाहिन्यांची अनिवार्यता मी समजू शकते. सातत्याने एक्‍झिट पोल दाखविणे आणि पॅनल चर्चा घडविणे म्हणजे भारतीय लोकशाहीतील बुद्धिमान लोकांचा अवमान आहे. हा काही तासांचा प्रश्‍न आहे. वाट पहा आणि बघा.' तर, समाजवादी पक्षाचे नेते रविदास मल्होत्रा म्हणाले, "अनेकदा एक्‍झिट पोल चुकीचे ठरतात. हे एक्‍झिट पोल त्यापैकीच एक आहेत. अखिलेश यादव हेच बहुमताने उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करतील.'

Web Title: All exit polls shows Rahul Gandhi's exit - BJP