'उन्नाव'शी संबंधित सर्व प्रकरणे दिल्लीत वर्ग करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

पीटीआय
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेशी संबंधित सर्व पाच प्रकरणे दिल्ली येथील न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. तसेच, बलात्कार पीडितेला अंतरिम भरपाई म्हणून 25 लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेशी संबंधित सर्व पाच प्रकरणे दिल्ली येथील न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. तसेच, बलात्कार पीडितेला अंतरिम भरपाई म्हणून 25 लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले. 

उन्नाव बलात्कार घटनेबाबत आधीपासूनच चार प्रकरणांची न्यायालयात सुनावणी सुरू असताना या घटनेतील पीडितेला गेल्या रविवारी अपघात झाला. हा अपघात होता की घातपात यावरून वाद होऊन न्यायालयात प्रकरण गेले. या प्रकरणाची सुनावणीही दिल्लीतच होणार असून, या अपघाताबाबतची चौकशी सात दिवसांत संपवावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. या कालावधीला केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मुदतवाढ मिळू शकते, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. 

अपघातामध्ये जखमी झालेली पीडिता आणि तिच्या वकील यांना एअर ऍब्म्युलन्समधून दिल्लीतील "एम्स'मध्ये हलविले जाऊ शकते, असे डॉक्‍टरांनी सांगितल्याची नोंद न्यायालयाने घेतली आणि कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास त्यांना दिल्लीत नेण्याबाबत आदेश काढू, असे स्पष्ट केले. 

न्यायालयाने दिलेले इतर आदेश

- अपघाताच्या घटनेची सात दिवसांत चौकशी संपवावी 
- मूळ प्रकरणाची सुनावणी 45 दिवसांत पूर्ण करावी 
- पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना "सीआरपीएफ'ची सुरक्षा 
- आज दिलेल्या आदेशांमध्ये कोणताही बदल करणार नाही 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All five cases transferred to Delhi court Supreme Court on Unnao Rape Case