#MeToo आलोकनाथ यांची न्यायालयात धाव 

पीटीआय
रविवार, 14 ऑक्टोबर 2018


पालकांनीच त्यांच्या मुलांना महिलांचा आदर करायला शिकवावे. समाजाचा पितृसत्ताक दृष्टिकोन बदलायला हवा. 

- मल्लिका शेरावत, अभिनेत्री 

नवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अभिनेते आलोकनाथ आणि त्यांच्या पत्नी आशू यांनी यांनी आज अभिनेत्री विनता नंदा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार केली आहे. 

अंधेरीतील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आज त्यांनी यासंबंधी अधिकृत तक्रार नोंदविली. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ""अकबर मला पकडून जबरदस्तीने चुंबन घेत होते,'' असा आरोप "सीएनएन'च्या महिला पत्रकार माजीली डी प्यू कॅम्प यांनी केला आहे. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीमध्येही काही महिला पत्रकारांनी स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात मोर्चा काढला होता. 

केशरचनाकार सपना भवनानी यांनी आज ट्विटच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला. "पिंक' या चित्रपटातून अमिताभ यांची प्रतिमा एका कार्यकर्त्यांसारखी झाली आहे; पण खरं वास्तव लवकरच पुढे येईल, असे म्हणत त्यांनी अमिताभ यांना टोला लगावला आहे. 

दरम्यान, अकबर यांच्यावरील आरोपांची भाजपचे अध्यक्ष अमित शहा चौकशी करणार असून, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनीही आज अभिनेते आलोकनाथ यांना लक्ष्य केले. त्यांच्यासोबत चित्रपट करतानाचा अनुभव भयानक होता, असा दावा त्यांनी केला. अभिनेत्री सिमरन कौर हिनेही दिग्दर्शक साजिद खानवर आरोप केल्याने त्याचे पाय आणखी खोलात गेले आहेत. ऑडिशनच्या नावाखाली साजिदने कपडे उतरवायला लावले होते, असा आरोप तिने केला आहे. 

क्रीडा क्षेत्रालाही धक्का 

#MeToo हे वादळ आता क्रीडा क्षेत्रामध्येही पोचले आहे, "बीसीसीआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर महिला पत्रकाराने लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगावरही आरोप झाले होते. 

महिलांनी केलेल्या आरोपांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, या मोहिमेमुळे एक मोठा सांस्कृतिक बदल होतो आहे. 

- विकी कौशल, अभिनेता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aloknath is in court For MeToo Case