'कॉंग्रेस-सप' आघाडीस मुलायमसिंह यांचा विरोध 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

दिल्लीमध्ये दाखल झालेल्या मुलायम यांनी लखनौमध्ये मात्र आघाडीवर भाष्य करणे टाळले होते, यावरूनच त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील आघाडीला पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी विरोध केला असून, आपण या आघाडीचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमच्या पक्षाकडे स्वबळावर निवडणूक लढण्याची क्षमता असल्याने मी या आघाडीच्या विरोधात असल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. हे आघाडीचे गणित जुळवताना आमच्या अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही, आता त्यांनी काय करायचे, पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी संधी गमावली आहे, असे त्यांनी नमूद केले. राहुल आणि अखिलेश यांच्या "रोड शो'च्या पार्श्‍वभूमीवर मुलायम यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सर्वाधिक काळ सत्ता भोगणाऱ्या कॉंग्रेसमुळेच देश पिछाडीवर गेला असून, आम्ही नेहमीच कॉंग्रेसला विरोध केला आहे. याआधी समाजवादी पक्ष स्वबळावर लढला, तेव्हा आम्हाला सत्ता मिळाली होती. आता आघाडीसाठी कोणतेही कारण दिसत नाही ,असे मुलायम यांनी स्पष्ट केले. आज दिल्लीमध्ये दाखल झालेल्या मुलायम यांनी लखनौमध्ये मात्र आघाडीवर भाष्य करणे टाळले होते, यावरूनच त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती. 

Web Title: Am against this alliance, won’t campaign: Mulayam after Akhilesh-Rahul meet