अमरसिंह यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

अमरसिंह यांना भाजपचा एजंट असल्याचे बक्षिस मिळाले. अमरसिंह यांच्यावर आम्ही केलेले आरोप खरे ठरले. अमरसिंह यांची सुरक्षा वाय वरून झेड दर्जाची करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांना केंद्र सरकारकडून 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. या सुरक्षेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून गटाकडून त्यांच्यावर टीका करत भाजपकडून पक्ष तोडण्यामुळे देण्यात आलेले बक्षिस असल्याचे म्हणण्यात आले आहे.

समाजवादी पक्षाचे (सप) खासदार नरेश अग्रवाल म्हणाले, की अमरसिंह यांना भाजपचा एजंट असल्याचे बक्षिस मिळाले. अमरसिंह यांच्यावर आम्ही केलेले आरोप खरे ठरले. अमरसिंह यांची सुरक्षा वाय वरून झेड दर्जाची करण्यात आली आहे. अमरसिंह यांनी पक्षात भांडणे लावण्याच्या केलेल्या कामामुळे त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. भाजप पहिल्यापासून समाजवादी पक्षाला तोडण्याच्या प्रयत्नात होते आणि आता ते स्पष्ट दिसत आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यानंतर झेड दर्जाची सुरक्षा मिळणारे अमरसिंह हे पक्षातील दुसरे नेते आहेत. अमरसिंह यांना यापूर्वी यूपीए-2 सरकारच्या काळात अशी सुरक्षा होती. या सुरक्षेमुळे अमरसिंह यांच्यासोबत सतत सशस्त्र पोलिस दलातील 24 कमांडो असणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने तात्काळ त्यांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: amar singh gets z catagory security