बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला सुरवात 

पीटीआय
बुधवार, 27 जून 2018

"हर हर महादेव'च्या गजरात अमरनाथ यात्रेसाठी सुमारे तीन हजार भाविकांचा पहिला जत्था आज कडक बंदोबस्तात रवाना झाला. सुमारे दोन महिने चालणाऱ्या यात्रेसाठी यंदा सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, मार्गादरम्यान विविध दलांचे शार्पशूटर तैनात करण्यात आले आहेत. त्यात जवान, एनएसजीचे कमांडो यांचा समावेश आहे. कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी जवान सज्ज असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. 
 

जम्मू: "हर हर महादेव'च्या गजरात अमरनाथ यात्रेसाठी सुमारे तीन हजार भाविकांचा पहिला जत्था आज कडक बंदोबस्तात रवाना झाला. सुमारे दोन महिने चालणाऱ्या यात्रेसाठी यंदा सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, मार्गादरम्यान विविध दलांचे शार्पशूटर तैनात करण्यात आले आहेत. त्यात जवान, एनएसजीचे कमांडो यांचा समावेश आहे. कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी जवान सज्ज असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. 

जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी भाविकांना कोणत्याही भीतीविना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सध्या काश्‍मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू आहे. दरम्यान, हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नायको याने ऑडिओ क्‍लिप प्रसारित केली असून, त्याने अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचे स्वागत केले आहे. तसेच यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा हल्ला केला जाणार नाही, असे आश्‍वासन दिले आहे. मात्र सुरक्षा दल कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नसून अमरनाथ यात्रेच्या मार्गावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

अमरनाथ यात्रा सुरक्षित पार पाडावी यासाठी भाविकांच्या वाहनांची रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगिंग करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण मार्गावर ड्रोन कॅमेऱ्याने लक्ष ठेवण्यात येणार असून, यावेळी प्रथमच सुरक्षेसाठी सीआरपीएफचे बाईक स्क्वॅड सहभागी झाले आहेत. हे पथक प्रत्येक दहा किलोमीटरनंतर नियंत्रण कक्षाला स्थितीची माहिती कळविणार आहेत. बाईकवरील जवानांसमवेत प्रथमोपचाराची व्यवस्थादेखील असणार आहे. 

यात्रेकरूंची नोंदणी 
2 लाख 11,994 
सुरक्षा व्यवस्था 
118 नियमित तुकड्या : अतिरिक्त तुकड्या 237 
सुरक्षा कोण पाहणार 
सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, लष्कर, जम्मू आणि काश्‍मीर पोलिस दलाचे जवान भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. 

Web Title: Amarnath yatra begins under security