अमरनाथ यात्रा अखेर रद्द 

पीटीआय
Wednesday, 22 April 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अमरनाथ यात्रा मंडळाने २३ जूनपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  राजभवन आणि अमरनाथ यात्रा मंडळातर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला.

जम्मू - कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अमरनाथ यात्रा मंडळाने २३ जूनपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्या नेतृत्वात राजभवनमध्ये बुधवारी याबाबत बैठक पार पडली. यानंतर राजभवन आणि अमरनाथ यात्रा मंडळातर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रा थांबवली होती. त्या निर्णयामुळे भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले होते. जम्मू-काश्मीरात कोरोनाचे ४०७ पॉझिटिव्ह रुग्ण असून यातील ३५१ रुग्ण एकट्या काश्मीर भागात आहेत. ज्या परिसरातून अमरनाथ यात्रेकरू जातात त्या काश्मीर खोऱ्यातील १० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. श्रीनगर, बारामुल्ला, बांदेपोरा आणि कुपवाडा ‘हॉटस्पॉट’ घोषित करण्यात आले आहेत. 

नियोजित कार्यक्रमानुसार अमरनाथ यात्रेसाठी एक एप्रिलपासून नोंदणीस सुरुवात होणे अपेक्षित होते. यात्रा सुरू होण्याच्या एका महिन्यापूर्वी मार्गातून बर्फ काढण्याचे काम सुरू होत असते. पण, यावेळी रस्त्यावर अजूनही तसाच बर्फ आहे. जम्मूमध्ये भाविकांना राहण्यासाठी बेस कॅम्प तयार केले जातात. परंतु, यावेळी हे बेस कॅम्प कोरोना संशयितांना क्वारंटाइन सेंटर म्हणून देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या सीमा आधीच सील करण्यात आल्या आहेत. यात जीवनावश्यक वस्तू वगळता कुठल्याही वाहनाला परवानगी दिली जात नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amarnath Yatra finally canceled