खूशखबर ! अॅमेझॉनचा सर्वात मोठा दिवाळी सेल 'या' तारखेपासून

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 16 September 2019

सणासुदीचा हंगाम सुरू होताच अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' या ऑनलाइन विक्री महोत्सवाची घोषणा आज केली.

नवी दिल्ली ः सणासुदीचा हंगाम सुरू होताच अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' या ऑनलाइन विक्री महोत्सवाची घोषणा आज केली. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा दिवाळी सेल असेल, असे अॅमेझॉनतर्फे सांगण्यात आले. हा विक्री महोत्सव येत्या 29 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू राहील. विशेष म्हणजे अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्सना 28 सप्टेंबरच्या दुपारी 12 पासूनच खरेदी करता येणार आहे.

या  'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' दरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरे, होम किचन प्रॉडक्‍ट, लार्ज अप्लायन्सेस, टीव्ही, फॅशन, ग्रोसरी, कन्ज्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स यांसारख्या उत्पादनांवर सवलत मिळेल. यासोबतच सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या बॅंक ऑफरचाही फायदा मिळणार आहे. बजाज फिनसर्व्ह त्याचप्रमाणे डेबिट, क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट ईएमआय, एसबीआय डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इन्स्टन्ट बॅंक डिस्काउंट आणि एक्‍स्चेंज ऑफर्स अशा काही सवलतींचा लाभ घेता येईल. तसेच या 'सेल' च्या कालावधीत  ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर स्क्रीन प्रोटेक्‍शन निःशुल्क मिळणार आहे.

अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलसोबतच 'अॅमेझॉन फेस्टिव्ह यात्रे' चीही घोषणा केली आहे. यासाठी अॅमेझॉन कंपनीने तीन ट्रक जोडून विशेष 'हाउस ऑन व्हील्स' तयार केले आहे. अॅमेझॉनवर विक्री होणाऱ्या सर्व उत्पादनांचे प्रदर्शन हाउस ऑन व्हील्सवर असणार आहे. ही यात्रा लखनऊ, अहमदाबाद आणि हैदराबाद या मार्गाने जाऊन बंगळुरू येथे तिचा समारोप होईल. या दरम्यान यात्रा आग्रा, चेन्नई, इंदूर, कोलकता, कोची, मथुरा, मुंबई, विशाखापट्टणम आदी 13 शहरांमध्ये जाईल. सुमारे सहा हजार किलोमीटरच्या या प्रवासातून भारतातील ग्राहकांशी अॅमेझॉनला जोडण्याचा प्रयत्न असेल.

Image may contain: sky and outdoor

'अॅमेझॉन इंडिया' चे उपाध्यक्ष (कॅटेगरी मॅनेजमेंट) मनीष तिवारी, उपाध्यक्ष गोपाल पिल्लई (सेलर सर्व्हिसेस) यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची घोषणा केली. यावेळी ट्रायफेडचे (ट्रायबल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन) व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा उपस्थित होते.

अॅमेझॉनशी देशभरातील पाच लाख विक्रेते जोडले गेले असल्याचे मनीष तिवारी यांनी सांगितले. या दिवाळीत चांगला व्यवसाय होईल असा विश्‍वास विक्रेत्यांना आहे, असे सांगताना तिवारी यांनी मंदीच्या विक्रीवर परिणामाची शक्‍यता आडवळणाने फेटाळली. तर, या विक्री महोत्सवाला व्यापारी संघटनांनी केलेल्या विरोधावरही अॅमेझॉनने प्रतिक्रिया देण्याचे टाळले. उत्पादनांच्या किमती विक्रेते ठरवतात. अॅमेझॉन केवळ विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील दुवा असल्याचे उपाध्यक्ष पिल्लई यांनी या वेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon India announces Great Indian Festival