आता चीनचं काही खरं नाही; भारताला साथ देण्यासाठी बलाढ्य देश आले पुढे

Sakal | Saturday, 4 July 2020

ड्रॅगनविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उभी करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असून चिनी विस्तारवादाला कंटाळलेल्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत

नवी दिल्ली, ता.४ (पीटीआय): पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात घुसखोरी करत भारताशी संघर्ष करणाऱ्या चीनचा जागतिक समुदायाकडून निषेध होतो आहे. ड्रॅगनविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उभी करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असून चिनी विस्तारवादाला कंटाळलेल्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्रामध्ये चीनला टक्कर देण्यासाठी भारत रणनितीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अंदमान आणि निकोबार बेटांजवळील लष्करी तळांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्याच्या विचारात आहे. मागील अनेक दिवसांपासून भारताचे या भागावर लक्ष होते, आता चीनच्या कारवायांमुळे येथील लष्करी पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारत विरुद्ध चीन: कागदावर ड्रॅगनची शक्ती मोठी, पण...
दुसरीकडे पाकिस्ताननेही आता ड्रॅगनसोबतच्या दोस्तान्यावर पुनर्विचार करायला सुरवात केली आहे. या अनुषंगाने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे चीनसोबतच्या धोरणामध्ये बदल करा अन्यथा जगातील बड्या महासत्ता आपल्याला वाळीत टाकतील अशी भीती व्यक्त केली आहे.

कोरोनाचा संसर्ग जगापासून दडवून ठेवणाऱ्या चीनने गलवान खोऱ्यात भारताविरोधात कुरापती सुरू केल्याने युरोपियन देशांनी राजनैतिक पातळीवर चीनला वेगळे टाकायला सुरवात केली आहे. चीनला पाठिंबा देण्याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागत असून युरोपियन महासंघातील काही देशांनी पाकिस्तानी विमानांना आपल्या भागात येण्यास मज्जाव केला आहे. बऱ्याच देशांनी चीनला राजनैतिक पातळीवर वेगळे पाडायला सुरवात केल्याने याची किंमत पाकिस्तानलाही मोजावी लागू शकते. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे गिलगिट आणि बाल्टिस्तानमध्ये चीनकडून मोठ्याप्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण सुरू असल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे. चीनमध्ये ऊईगर मुस्लिमांची गळचेपी होत असल्याने पाकिस्तानात चीनविरोधात संतापाची भावना आहे.

अमेरिकेच्या युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात

युद्धसराव करण्यासाठी अमेरिकेच्या नौदलाने दोन आण्विक युद्धनौका यूएसएस निमित्झ आणि यूएसएस रोनाल्ड रेगन यांना दक्षिण चिनी समुद्रामध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या दोन्ही नौकांना लुझॉन खाडी ओलांडल्याचे समजते. दरम्यान काही दिवसांपूर्वी चीनने याच भागामध्ये युद्धसराव घेतला होता. अमेरिकेने त्याला आक्षेप घेतला होता. स्वतंत्र आणि मुक्त भारत-प्रशांतला पाठिंबा देण्यासाठी आम्ही येथे सराव घेतो आहोत असे अमेरिकेकडून सांगण्यात आले.

चीनचं युद्ध : जर-तरच्या गोष्टी (श्रीराम पवार)
जिनपिंग यांचा जपान दौरा बारगळणार

हाँगकाँगमधील दडपशाही आणि भारतासोबतच्या संघर्षामुळे चीनची जपानमध्येही कोंडी झाली असून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा प्रस्तावित जपान दौरा बारगळू शकतो. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षातूनच जिनपिंग यांना कडवट विरोधत होतो आहे. चीनच्या हाँगकाँगमधील धोरणावर जपानी नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचे निमित्त करून चीन हाँगकाँगवरील पकड मजबूत करत असल्याचे जपानचे म्हणणे आहे.