महाराष्ट्रातील खासदारांनो 'एकला चलो रे'ची तयारी ठेवा: शहा

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. शिवसेनेशी आघाडीचे प्रयत्न सुरू राहतील. मात्र प्रसंग उद्भवल्यास "एकला चलो रे'चीही तयारी पक्षाने ठेवावी, असेही संकेत शहांनी बैठकीत दिल्याचे दिल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या सर्व राज्यांमधील खासदारांच्या स्वतंत्र आढावा बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. त्या क्रमामध्ये आज महाराष्ट्रातील खासदारांशी शहा यांनी संवाद साधला. नवीन महाराष्ट्र सदनात ही बैठक झाली. परिवहनमंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि दोन्ही सभागृहांमधील खासदार उपस्थित होते. भाजपच्या मदतीने राज्यसभेवर पोचलेले नारायण राणेही उपस्थित होते. राज्यातील राजकीय परिस्थिती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित संभाव्य महाआघाडीचे आव्हान तसेच भाजपची निवडणूक तयारी याबद्दल शहा यांनी खासदारांची मते जाणून घेतली आणि तयारीला लागण्याचे आदेश दिले. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील आघाडीसंदर्भात शिवसेनेने घेतलेली ताठर भूमिका, रोजच्या रोज शिवसेनेकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर केली जाणारी टोकाची टीका, शिवसेनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नरमाईचा पवित्रा या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची उपयुक्तता आणि या पक्षाची संभाव्य रणनीती यावरही पक्ष खासदारांची मते शहा यांनी जाणून घेतली. 

शिवसेनेचा मुद्दा केंद्रस्थानी 
या बैठकीबाबत भाजप खासदारांनी माध्यमांसमोर मौन पाळणेच पसंत केले. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना हा मुद्दा केंद्रस्थानी होता. युती न झाल्यास मतविभाजनाचा फटका बसू शकतो, असा चिंतेचा सूरही बैठकीत व्यक्त झाला, तर युतीचे सर्व प्रयत्न सुरू असले तरी आयत्या वेळी अडचण नको म्हणून सर्व जागा लढविण्याचीही भाजपने तयारी ठेवावी, असे शहांनी सांगितल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com