Rafale Verdict : गैरव्यवहाराचे पुरावे होते? मग काँग्रेसने न्यायालयात का नाही दिले?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

या व्यवहारात संशयास्पद गोष्टी होत्या, असा काँग्रेसचा दावा होता. याचे पुरावेही असल्याचे ते सांगत होते. मग हे पुरावे न्यायालयात सादर का केले नाहीत?

नवी दिल्ली : 'राफेल विमान खरेदीच्या व्यवहारांमधील गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. मग सर्वोच्च न्यायालयासमोर काँग्रेसने हे पुरावे का सादर केले नाहीत', असा प्रश्‍न भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित केला. राफेल व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगत न्यायालयाने याविरोधातील याचिका फेटाळल्या. त्यानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

'या व्यवहारात संशयास्पद गोष्टी होत्या, असा काँग्रेसचा दावा होता. याचे पुरावेही असल्याचे ते सांगत होते. मग हे पुरावे न्यायालयात सादर का केले नाहीत? या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी काँग्रेस करत आहे. पण एखाद्या विषयावर संसदेत चर्चा झाल्यानंतरच त्यासंदर्भात 'जेपीसी' नेमली जाते. राफेलवर काँग्रेसने संसदेत चर्चा करावी, असे आमचे आव्हान आहे', असे अमित शहा म्हणाले. 

'सूर्यावर चिखल फेकायला गेलात, तर तो चिखल तुमच्याच अंगावर पडतो. यापुढे राहुल गांधी यांनी असे निराधार आणि बालीश आरोप करणे टाळावे', असा इशाराही शहा यांनी दिला. 

राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. 'राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही', असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. 

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारातील कथित गैरव्यवहार हा प्रचाराचा मुद्दा बनविला होता. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोदी सरकारला या प्रकरणी घेरले होते. 

अनिल अंबानींकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत 
गांधींनी स्वत:चा फायदा पाहिला; आता माफी मागा : भाजप

Web Title: Amit Shah challenges Congress to put Rafale scam evidences in court of law